नाशिक: आयशर कंटेनरसह ९४ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

नाशिक (प्रतिनिधी): राज्य उत्पादन शुल्कच्या मालेगाव विभागाने सौंदाणे शिवारातील तुळजाई ढाब्यासमोर सापळा रचून संशयावरून आयशर कंटेनर तपासणीसाठी ताब्यात घेतला असता त्यात गोवा राज्यात निर्मित व गोवा राज्यातच विक्री करीता असलेला परराज्यातील मद्याचा साठा मिळून आला.

यावेळी पथकाने कंटेनरसह ९४ लाखांचे परराज्यातील मद्य जप्त केले असून आयशर कंटेनर चालकाला अटक केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्कच्या मालेगाव विभाग पथकाला गुप्त माहिती मिळाली होती.

त्यानंतर राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी (भा.प्र.से.), संचालक (अ.व.व दक्षता) सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त नाशिक विभाग, डॉ. बी.एच.तडवी, अधीक्षक नाशिक, शशिकांत गर्जे, उपअधीक्षक, अ.सु. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे निरीक्षक दशरथ जगताप, दुय्यम निरीक्षक हर्षराज इंगळे, पंढरीनाथ कडभाने, येवला विभागाचे निरीक्षक व्ही. ए. चौरे आदींनी दारुबंदी गुन्ह्यासंदर्भात महामार्गावर विविध ठिकाणी सापळा रचत वाहन तपासणी सुरु केली.

यावेळी त्यांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील तुळजाई ढाब्यासमोर (सौंदाणे शिवार ता.मालेगाव, जि. नाशिक) येथे दारुबंदी गुन्ह्याकामी सापळा रचून वाहनांची तपासणी करतांना एक तपकिरी रंगाची आयशर कंपनीचे सहाचाकी मालवाहतूक वाहन क्रमांक जी. जे. ३५ टी. ३५५८ हे तपासणीकामी अडवले असता त्यात गोवा राज्यात निर्मित व गोवा राज्यातच विक्री करीता असलेला परराज्यातील मद्याचा साठा मिळून आला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने वाहनासह परराज्यातील विविध ब्रँन्डचा विदेशी मद्यसाठा व बियरचा साठा जप्त केला. तसेच वाहनचालक कमलेश भारमल राम याला देखील अटक करण्यात आली.

दरम्यान, यानंतर कंटेनर येथील कार्यालयात आणून विदेशी मद्यसाठा व बियरच्या साठ्याची मोजणी केला असता विदेशी मद्याचे व बियरचे एकूण ९०० बॉक्स मिळून आले. तसेच मद्यसाठा कंटेनरसह ९४ लाख २४ हजार ६०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यानंतर कंटेनरचालक कमलेश राम व पुरवठादार आणि वाहन मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी दशरथ जगताप अधिक तपास करत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790