भाग्यश्री गिलडा, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप
नाशिक: कोविड-१९ संक्रमणाला अटकाव करताना प्रशासनातील बेबनाव व समन्वयाचा अभाव पुन्हा समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दुकानांना आता वेळेचे निर्बंध असणार नाही असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी बुधवारी (दि. १० जून) सांगितले होते. मात्र आज सायंकाळी पाच वाजताच पोलिसांनी शहरात दुकानं बंद करायला लावली. “पाच वाजले, दुकानं बंद करा !” असे सांगण्यात आले. त्यामुळे आता खरोखरच वेळेचे निर्बंध काढले आहेत की नाही असा संभ्रम दुकानदारांमध्ये झाला आहे.
काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून सम-विषमप्रमाणे दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मंगळवारी P-1 आणि P-2 चं “मार्किंग” करण्यात आलं आणि दुकानदारांमधील संभ्रम दूर झाला. बुधवारी दुकानांच्या वेळेबाबत जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची बैठक झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानांवरचे वेळेचे निर्बंध काढल्याचे सांगितले. म्हणजेच याआधी जी सायंकाळी पाच वाजेची मर्यादा होती ती काढण्यात आली.
परंतु आज (गुरुवारी दि. ११ जून ) सायंकाळी पाच वाजताच पोलिसांनी दुकानदारांना दुकानं बंद करण्यास सांगितले. त्यामुळे आता दुकानदारांमध्ये पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. याबद्दल नाशिक कॉलिंगने मेनरोडच्या दुकानदारांशी संपर्क साधला. यातील एका व्यावसायिकाने सांगितले “आम्ही सकाळी पेपर मध्ये वाचले होते आणि त्यानुसार दुकान सुरु ही ठेवले होते. पण ५ वाजता पोलिसांनी दुकानं आवरण्यास सांगितले. आम्ही पोलिसांना विचारले असता पेपर वर विश्वास ठेऊ नका असे उत्तर त्यांनी दिले आणि दुकानं आवरण्यास सांगितले.”
याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी नाशिक कॉलिंगने पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त या दोघांशीही फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोनला प्रतिसाद मिळाला नाही.