नाशिक (प्रतिनिधी): वाहनचालक परवान्याचे बनावटीकरण टाळण्यासाठी या परवान्याला आधार क्रमांक आता लिंक करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्रीय परिवहन मंत्रालयाने घेतला आहे. ज्या पद्धतीने पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक केले तशाच पद्धतीने वाहन परवानाही आधारकार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे.
वाहन चालवण्याचा परवानादेखील बोगस मिळत असल्याने याचा गैरवापर वाढत आहे. आरटीओसंदर्भात कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी फेसलेस प्रणाली विकसित करण्यात आली आहे. याद्वारे आता वाहन परवानाही घरबसल्या मिळणार आहे. यात भविष्यात बनावटीकरण करण्याची शक्यता असल्याने केंद्रीय परिवहन मंत्रालयाने वाहन परवान्याशी आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे.
अशा पद्धतीने करा लिंक..
ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डला लिंक करण्यासाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जावे. लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा. ड्रॉप-डाऊनवर जाऊन ‘ड्रायव्हिंग लायसन्स’च्या पयार्यावर क्लिक करा. ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर विचारला जाईल. तो नोंदवल्यानंतर ‘गेट डिटेल्स’ या पयार्यावर क्लिक करावे. आधारकार्ड नंबर आणि मोबाइल नंबर नोंदवून सबमिटवर क्लिक करावे. मोबाइल नंबरवर एसएमएसद्वारे एक ओटीपी येईल. ओटीपी नोंदवल्यानंतर तुमच्या आधार कार्डला ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.