Breaking: नाशिकमध्ये 13 लाखांचा बनावट तूप व पनीरचा साठा जप्त

Breaking: नाशिकमध्ये 13 लाखांचा बनावट तूप व पनीरचा साठा जप्त

नाशिक (प्रतिनिधी): अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने अंबड आणि म्हसरुळ या दोन ठिकाणी छापे मारून सुमारे 12 लाख 97 हजार रुपयांचा बनावट तूप आणि पनीरचा साठा जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी दोन्ही कारखाने सील करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाने सणावाराच्या दृष्टीने भेसळयुक्त अन्न पदार्थांविषयी मोहीम सुरू केलेली असून त्याचाच भाग म्हणून दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल उत्पादक व रिपॅकर, घाऊक विक्रेते यांच्यावर प्रशासनामार्फत नाशिक जिल्ह्यात कारवाई करण्यात येत आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. पाटील, अमित रासकर व एस. के. पाटील यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंबड येथील मे. मधुर डेअरी अ‍ॅण्ड डेलीनिड्स या आस्थापनेवर धाड टाकली. यावेळी दुकानांमध्ये आप्पासाहेब हरी घुले (वय 39) नामक इसम विक्रेता म्हणून हजर होता.

👉 हे ही वाचा:  विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षण: नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

दुकानात अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना आढळून आला नाही. तरी आस्थापनेत विनापरवाना बनावट पनीर व तुपाचे उत्पादन विक्रीसाठी करीत असल्याचे आढळले. हे पनीर रिफाईंड पामोलीन तेलाचा वापर करून बनावटरीत्या तयार करीत असताना आढळून आले आहे. त्यामुळे या ठिकाणी कारवाई करताना या कारखान्यात तयार झालेले पनीर व तूप हे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 मध्ये नमूद तरतुदीनुसार तयार केले जात नाहीत, या विक्रेता घुले यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत कोणताही वैध परवाना त्यांच्या उत्पादनाच्या जागेसाठी धारण केलेला नसल्यामुळे विक्रेता घुले यांच्याकडील पनीर, अ‍ॅसिटिक अ‍ॅसिड, रिफाईंड पामोलिन तेल आणि तूप यांचा एकूण 2 लाख 35 हजार 796 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. वैध परवाना धारण केल्याशिवाय अन्न व्यवसाय न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा अधिकारी डी. डी. तांबोळी, अ. र. दाभाडे व गो. वि. कासार यांच्या पथकाने म्हसरूळ येथील मे. आनंद डेअरी फार्म या दुकानात धाड टाकली. त्यावेळी तेथे आनंद वर्मा (वय 50) नामक व्यक्तीस विचारपूस केली असता विक्रीसाठी तयार केलेले पनीर हे बनावट दूध पावडर व खाद्यतेलाचा वापर करून उत्पादित केलेले असल्याचे सांगितले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात शेतकऱ्याला मारहाण करत लूट

त्या ठिकाणी असलेला दूध पावडर, रिफाईंड पामतेलाचा साठा उपलब्ध असल्याने या पनीरचा नमुना, तसेच भेसळ केलेले पदार्थ यांचे नमुने घेऊन त्यांचा एकूण 9 लाख 67 हजार 315 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. हे दोन्ही कारखाने सिल करण्यात आलेले आहेत.

या दोन्ही कारखान्यांवर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या पथकाने, सहाय्यक आयुक्त (अन्न) उ. सि. लोहकरे यांच्या निर्देशानुसार व नाशिक विभागाचे सहआयुक्त ग. सु. परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790