Breaking: देवळाली कॅम्पच्या लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया मेजरला अटक!
नाशिक (प्रतिनिधी): काही दिवसांपूर्वी देवळाली कॅम्पच्या हद्दीत तोतया अधिकारी म्हणून एकाने प्रवेश केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवारी (दि. ५ जानेवारी) सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे स्कूल ऑफ आर्टिलरीच्या अधिकाऱ्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात माहिती दिली की,
दोन संशयित इसम हे आर्मीशी संबंधित नसतांनाही आर्मी चेक पोस्ट येथील प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.
या प्रकारचे गांभीर्य ओळखून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस कुंदन जाधव यांनी वरिष्ठांना हि माहिती कळविली.
वरिष्ठांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे तत्काळ पोहोचून दोन्ही संशयित इसमांकडे तब्बल दोन तास सखोल चौकशी केली. यावेळी या संशयितांकडे ‘आर्मी’ असे इंग्रजीत लिहिलेली एक मोटार सायकल आणि महिंद्रा कंपनीची एक जीप मिळून आली. तसेच त्यांच्या जवळ आर्मीचा सिम्बॉल असलेले आयडी कार्डचे कव्हर ज्यामध्ये ‘एक्स इंडिअन आर्मी सिक्युरिटी सर्व्हिसेस, महाराष्ट्र’ असे लिहिलेले ओळखपत्र आणि आर्मीचे जवान वापरतात तशी पॅन्ट आणि बूट आढळून आले.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”9651,9649,9643″]
त्यांच्याकडे पोलिसांनी व आर्मीच्या अधिकारी यांनी केलेल्या अधिक चौकशीत त्यांची नावे: मोहम्मद असद मुजीबुल्लाहखान पठाण आणि आफताब मन्नत शेख उर्फ मेजर खान अशी असल्याचे समजले. मात्र त्यांनी ही ओळखपत्र कोठे आणि का बनविली याबाबत त्यांनी अजूनही समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहे.
या आदेशावरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे कुंदन जाधव यांनी या दोनही इसमांवर तोतयेगिरी करणे, शासकीय गुपिते अधिनियामान्वये गुन्हा दाखल केला आहे.