Breaking: नाशिकला कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे यंत्रणेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचं दिसत आहे.
जिल्ह्यात पाच दिवसात एकूण पाचशे रुग्ण वाढले आहेत.
यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
शहरात मंगळवारीसुद्धा कोरोना रुग्ण संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झालेली असताना नाशिक शहरात काही दिवसांपूर्वी ओमीक्रॉनचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. ओमीक्रॉनची रुग्ण संख्या आणि कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नये याकरता आता यंत्रणेने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
ओमीक्रॉनचा रूग्ण ज्या इमारतीत असेल, ती इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आणि/किंवा कोरोनाचे पाच रुग्ण ज्या इमारतीत असतील ती संपूर्ण इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. तर बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणीही करण्यात येणार आहे.
याठिकाणी एक वैद्यकीय पथकही नेमण्यात येणार आहे. शहरात आढळून आलेल्या संशयित ओमीक्रॉन रूग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेऊन त्यांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर संशयित रुग्णाला नवीन बिटको रुग्णालयातील विशेष कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. कडक निर्बंध लागू नये याकरिता प्रशासनाने नियमांचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.