NC

नाशिक: बहुचर्चित एमडी प्रकरण: भूषण, अभिषेकला सात दिवसांची पोलीस कोठडी !

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): बहुचर्चित ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याचा भाऊ संशयित मास्टरमाइंड भूषण पानपाटील व त्याचा ‘खजिनदार’ अभिषेक बलकवडे या दोघांचा ताबा नाशिक पोलिसांनी पुणे पोलिसांकडून मंगळवारी घेतला. बुधवारी (दि.६) जिल्हा व सत्र न्यायालयात या दोघांना नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने हजर केले.

जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. यू. मोरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यांनी दोघांना येत्या बुधवारपर्यंत (दि.१३) तर त्यांचा साथीदार संशयित शिवाजी शिंदे यास शनिवारपर्यंत (दि.९) पोलिस कोठडी सुनावली.

🔎 हे वाचलं का?:  चौथे विश्व मराठी संमेलन: कृत्रिम बुद्धिमतेच्या माध्यमातून मराठी भाषेत ज्ञान, सेवा व विविध क्षेत्रात संधी उपलब्ध होणार- संतोष साळवी

दोन महिन्यांपूर्वी गावात नाशिकरोड पोलिसांनी धाड टाकून एक गोदाम उदध्वस्त केले होते. या गोदामातून एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा साठा पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हस्तगत केला होता.

हे गोदाम संशयित ड्रग्जमाफिया ललित पानपाटील याचे की त्याचा भाऊ संशयित भूषण पानपाटलाचे?, असा प्रश्न कायम होता. यासाठी नाशिक पोलिसांना संशयित शिवाजी शिंदेसह भूषण व अभिषेक यांचाही ताबा मिळण्याची प्रतीक्षा होती. कारण त्यांच्या चौकशीनंतरच या गुन्ह्याच्या तपासाला वेग देता येणार आहे. मुंबई पोलिसांकडून शिंदेचा ताबा घेतल्यानंतर त्याची चौकशी सुरू होती. त्यानंतर पुणे पोलिसांकडून भूषण व अभिषेक यांचाही ताबा पोलिसांनी घेतला.

🔎 हे वाचलं का?:  कुंभमेळा २०२७: विद्युत सुशोभीकरण व एलईडी कामांबाबत कुंभमेळा प्राधिकरणाची समन्वय बैठक

शिंदेची पोलिस कोठडी बुधवारी (दि.६) संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास पुन्हा तीन दिवसांच्या कोठडीत वाढ करण्यात आली. तसेच पुढील चौकशीकरिता भूषण व अभिषेक यांच्या कोठडीची मागणी सरकार पक्षाकडून अॅड. देवरे यांनी केली.

सरकारी पक्षाचा न्यायालयातील युक्तिवाद:
साकीनाका पोलिसांनी उदध्वस्त केलेला कारखाना हा कोणाचा ? नाशिक पोलिसांनी उद्ध्वस्त केलेले गोदाम व कारखाना यांचा नेमका संबंध काय ? गोदामात एमडी पावडरचा इतका मोठा साठा व अन्य कच्चा माल कोठून व कसा आणि कोणाच्या सांगण्यावरून साठवून ठेवण्यात आला ? अशा सर्व बाबींचा तपास नाशिक पोलिसांना अद्याप करावयाचा आहे. या गुन्ह्यात हे तिघेही मुख्य संशयित असल्याने त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. या तिघांचे आणखी कोणी साथीदार आहेत का ? कंपनी कोणाच्या नावे सुरू करण्यात आली, तेदेखील शोधायचे आहे, यासाठी पोलिस कोठडीची मागणी असल्याचे सरकारी पक्षाकडून न्यायालयात करण्यात आली. भूषण, अभिषेकसह शिंदेचा ताबा नाशिक पोलिसांना हा पहिल्यांदाच मिळाला आहे. यापूर्वी ते पुणे, मुंबई पोलिसांच्या ताब्यात होते, असेही न्यायालयाला यावेळी सांगण्यात आले. यावेळी या तिघांच्या वकिलांकडून युक्तिवाद करत न्यायालयीन कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत सरकार पक्षाची विनंती मान्य केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790