नाशिक: चोरीस गेलेल्या ट्रॅक्टरसह आरोपी ताब्यात; मालकासह कुटुंबात दिवाळीचा आनंद द्विगुणित

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा

नाशिक (प्रतिनिधी): आठ दिवसांपूर्वी तालुक्यातील भऊर येथील शेतकरी मयूर सुरेश पवार यांचा चोरीस गेलेला ट्रॅक्टर शुक्रवारी (ता.१०) सापडला. देवळा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गेलेली लक्ष्मी परत आल्याने ट्रॅक्टरमालकांच्या कुटुंबात खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी होत आहे.

भऊर (ता. देवळा) येथील शेतकरी मयूर पवार यांचा स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ७३५ एक्सटी मॉडेलचा ट्रॅक्टर (एमएच ४१-०६३७) दोन नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास शेतातून चोरट्यांनी चोरला होता.

याबाबत पवार यांनी देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दुष्काळी परिस्थितीत ट्रॅक्टर चोरीला गेल्याने मोठे संकट शेतकऱ्याच्या कुटुंबापुढे उभे राहिले होते. या चोरीमुळे शिवारात चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याने या चोरीतील आरोपी पकडणे आणि ट्रॅक्टर पुन्हा मिळवून देणे हे मोठे आव्हान देवळा पोलिसांपुढे होते.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दामोदर काळे यांनी पोलिसनाईक निवृत्ती भोये, इंद्रजित बर्डे, सागर पाटील यांचे तपासपथक नेमत तपासाला सुरवात केली. चोरलेला ट्रॅक्टर कोणत्या दिशेला गेला याचा सुरवातीला तपास सुरू केला. त्यात देवळा शहरातील चारहीबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता हा ट्रॅक्टर एका मोटरसायकलच्या मागे मालेगावच्या दिशेने नेल्याचे लक्षात आले.

तपासाधिकारींनी सीसीटीव्हीद्वारे माग काढला असता त्याचे धागेदोरे मालेगावमार्गे चाळीसगावपर्यंत गेल्याचे दिसले. यातील सर्व तांत्रिक बाबी तपासत पोलिसांनी एक संशयित आरोपी निश्चित केला. आरोपीच्या मोबाईलनंबरच्या माध्यमातून नाना युवराज ठाकरे (रा. अजंग, ता. मालेगाव) यास चांदवड येथे मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

⚡ हे ही वाचा:  नाशिक शहरातील सहायक पोलीस आयुक्तांची खांदेपालट

त्याच्याकडे चौकशी केली असता दुसरा संशयित आरोपी रोहित नारायण शिंदे (रा. नारायणखेड, ता. चांदवड) याच्याकडे ट्रॅक्टर असल्याची माहिती त्याने दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सावधगिरीने रोहितला त्याला ताब्यात घेतली असता त्याच्याकडे ट्रॅक्टर मिळून आला. संशयित आरोपींनी सदर ट्रॅक्टर चोरी करून चाळीसगाव तालुक्यात विकण्याचा प्रथम प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश न आल्याने तो ट्रॅक्टर त्यांनी चांदवड परिसरात आणून लपवून ठेवला होता.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: रस्त्यात अडवून जबरी लूट करणाऱ्या दोघांना अटक !

कुठल्याही प्रकारचे धागेदोरे नसताना पोलिसांनी तांत्रिक तपास व रात्रंदिवस मेहनतीच्या जोरावर आरोपी आणि ट्रॅक्टर मिळवण्यात यश मिळाल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. पोलिस उपविभागीय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तपास करण्यात आला. शेतकरी कुटुंबात तर हा आनंद जोरात साजरा केला जात आहे.

‘‘ट्रॅक्टर शोधण्यासाठी पोलिसांचे मोठे सहकार्य लाभले. याशिवाय सीसीटीव्ही वाले, मित्रकंपनी, नातेगोते, भाऊबंदकी यांचीही मदत मोलाची ठरली. ट्रॅक्टर मिळाल्याने खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी करण्याचा आनंद आम्ही घेत आहोत.” – मयूर पवार, भऊर, ता.देवळा.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here