नाशिक (प्रतिनिधी): कोरोना संसर्गामुळे आधार नोंदणी अन् अद्ययावतीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले होते. नागरिकांच्या हाताच्या ठश्यांचा थेट संपर्क बायोमेट्रिक मशीनवर येत होता. त्यामुळे आधारची सर्वच कामे थांबवण्यात आली होती. परंतु, आता अनलॉक झाल्याने पुन्हा आधार केंद्र सुरू झाली असून, आधार अद्ययावतीकरण अन् नवीन नोंदणीचे कामही केले जात आहे. जिल्ह्यातील २०० केंद्रावर हे कामे सुरू झाले आहे.
कोरोनामुळे सर्वत्रच ऑनलाइनच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. गर्दी होईल असे कुठलेही काम केलेच जात नाही. त्यामुळे आधार केंद्र बंद झाली होती.शिवाय वर्षभरात अपवाद वगळता ही केंद्र बंद होते. त्यामुळे अनेक नागरिकांची आधार दुरुस्ती, पुनर्नोंदणी, अद्ययावतीकरणाची कामे रखडली होती. त्यासोबतच नवीन नोंदणी धारकांनाही प्रतीक्षा करावी लागत होती. शासकीय, निमशासकीय अन् बहुतांशी ठिकाणी आधार बंधनकारक असल्याने अनेकांची कामेही रखडली होती. त्यामुळे नागरिकांकडून केंद्र सुरू करण्याबाबत विचारणा होत होती.
त्याची दखल घेत जिल्ह्यातील २०० आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे. १०५ केंद्र राज्य शासकीय कार्यालयांच्या आवारात आहे. बँकेत ३७ केंद्र सुरू असून, ५२ केंद्र ही सीएसी आणि ई-गव्हर्नन्सची कामे सुरू असलेल्या ठिकाणी आहेत. ६ केंद्र ही पोस्ट कार्यालयांमध्ये आहे. ही सर्वच केंद्र आता नियमितपणे सुरू झाली आहेत. त्यामुळे नागरिकांनाही रखडलेली कामेही पूर्ण करता येतील. आधार नोंदणी बाबत कुठलीही अडचण असल्यास जिल्हा प्रशासनाने संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.