नाशिक(प्रतिनिधी): संचारबंदीत ग्रामीण व कृषी जीवनावर परिणाम होवू नये, त्यासाठी विशेष काळजी घेण्यात येत असून अनुषंगाने कृषी क्षेत्रातील व्यवहारांवर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून समन्वय ठेवला जात आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थचक्र सुरू राहुन लॉकडाउनच्या काळात नागरीकांना दैनंदिन भाजीपाला, अन्नधान्य पुरविण्यासाठी चांगलाच हातभार लागला आहे. तसेच एका दिवसात ४.६७ लाख लिटर दुधाचे संकलन करण्यात येत आहे.
त्यापैकी शहरात २.२१ लाख लिटर दुधाची विक्री करण्यात आली आहे. शेतीसाठी आवश्यक बाबींसाठी किटकनाशके, खते, बियाणे यांची प्रत्येकी ५९१ केंद्र सुरू असून द्राक्ष निर्यातदार व पॅक हाऊसची चार युनिट कार्यान्वित करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील १७ बाजार समित्यांपैकी ९ बाजार समित्यांमध्ये शेतमालाचे लिलाव करण्यात आले आहेत. त्यातील ८ बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव झाले असून या लिलावाच्या वेळी बाजार समित्यात ५० हजार ६२५ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे, अशी माहिती मांढरे यांनी दिली आहे.