नाशिक शहरातल्या सात हजार नळजोडण्या खंडित करण्याच्या नोटिसा
नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या दोन्ही लाटांमुळे घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी चारशे कोटींपर्यंत पोहोचल्याचे बघून चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सुमारे तीनशे कोटींची घट येत असल्याचे लक्षात घेत अखेर पाणीपुरवठा विभागाने बड्या थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून २० हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ७१८० नळ कनेक्शनधारकांना महापालिकेने नोटीस पाठवत सात दिवसांत थकबाकीची रक्कम न भरल्यास नळ कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती चिंताजनक झाली असून त्याचे प्रमुख कारण म्हणजे घरपट्टी व पाणीपट्टीच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. मुळात, पाणीपुरवठा हा विषय नफा व तोट्याचा नसून शहरातील नागरिकांना मूलभूत गरजा देण्याच्या दृष्टीने तोट्याचा पांढरा हत्ती पोसला जात आहे.
नाशिक शहरासाठी सुमारे दोन लाख नळ कनेक्शनधारक असून तूर्तास, थकबाकी मात्र १०६ कोटींच्या घरात पोहोचली आहे. दुसरीकडे थकबाकी वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे ४० टक्क्यांपर्यंत वाढलेली पाणीगळती आणि हिशेबबाह्य पाण्याचा वापर हेदेखील आहे. यामुळेही पाणीपुरवठा योजना अडचणीत आली आहे. घरपट्टीप्रमाणे पाणीपट्टीसाठी सवलत योजना दिली नसल्यामुळे नागरिक पाठ फिरवत असल्याचे बोलले जाते.
कोरोनामुळे गेले काही दिवस अर्थचक्र ठप्प झाल्याचे बघून महापालिकेने सक्तीने करवसुली केली नव्हती. मात्र, दुसरी लाट ओसरल्यानंतरही करभरणा होत नसल्यामुळे आता जप्ती वॉरंट बजावण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्याचाच एक भाग म्हणून बड्या थकबाकीदारांचे नळकनेक्शन तोडण्याचा निर्णय घेतला असून विभागनिहाय थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे.