नाशिक (प्रतिनिधी): राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाने स्वागत समारंभ व विवाह सोहळा यासाठी ५० लोकांना परवानगी दिली आहे. मात्र बहुतांश विवाह व स्वागत सोहळा शनिवारी वा रविवारी आयोजित करण्यात येतात. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही बाब लक्षात घेत परवानगी द्यावी, अशी मागणी मंगल कार्यालय व लॉन्स असोसिएशनने संघटनेचे अध्यक्ष सुनील चोपडा यांनी केली आहे.
जिल्हा प्रशासनाने सोमवार (दि. ७) पासून पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत जिल्ह्यात ५० लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य संपन्न करण्यास परवानगी दिली. परंतु निर्बंधांमुळे शनिवार, रविवारी संपूर्णपणे लॉकडाऊन असल्याने या दिवशी लग्नकार्य पार पडणार नसल्याचे चित्र आहे, मात्र जून व जुलै महिन्यात फक्त १२-१३ मुहूर्त असून त्यापैकी निम्मे मुहूर्त हे शनिवार व रविवारी आहे.
विवाह हा मुहूर्तावरच करण्याची नागरिकांची मागणी असते, मात्र शनिवार व रविवार रोजी जिल्हा बंद असल्याने ज्यांच्याकडे शुभकार्य आहे, अशा नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे असोसिएशनच्या वतीने प्रशासनाला विनंती केली आहे की शनिवारी-रविवारी विवाह साेहळ्यांना परवानगी द्यावी. यावेळी असोसिएशन अध्यक्ष सुनील चोपडा, संदीप काकड, उत्तमराव गाढवे, केशवराव डिंगोरे, प्रवीण कांबळे, योगेश भोर आदींनी केली.