नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने संस्थानच्या मालकीच्या असलेल्या शिवप्रासाद या इमारतीत शंभर बेडच्या रुग्णालयाला पुरवठा करता येईल, इतक्या क्षमतेचा ऑक्सिजन निर्मिती प्लांट स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गुरुवारी सर्व विश्वस्तांनी एकमताने मंजुरी दिली.
त्यासाठी सुमारे ५३ लाखांपेक्षाही जास्त खर्च येणार आहे. कोरोना काळातील दिवसेंदिवस गंभीर होणारी स्थिती, रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची वाढती आवश्यकता यावर विचारविनिमय आणि उपायोजना यासाठी गुरुवारी देवस्थान ट्रस्ट येथे सर्व विश्वस्तांची बैठक झाली.
यावेळी चेअरमन विकास कुलकर्णी, सचिव संजय जाधव, प्रशांत गायधनी, संतोष कदम, सत्यप्रिय शुक्ल, पंकज भुतडा, दिलीप तुंगार, भूषण अडसरे, तृप्ती धारणे आदी पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. बारा ज्योर्तिलिंगातील एक धार्मिक स्थान असल्यामुळे येथे देशभरातून येणारे भाविक, कुंभमेळ्यातील गर्दी व प्रसंगी उपचारार्थी रुग्णांची वाढती संख्या यामुळे उपचारांच्या सुविधा मिळावेत, यासाठी पूर्वीच्या विश्वस्तांनी शिवप्रासाद येथे रुग्णालय व्हावे, यासाठी वेळोवेळी प्रयत्न केला होता. परंतु त्यास यश आले नव्हते. सध्या या इमारतीत कोरोना सेंटर आहे. शहर व परिसरातील रुग्णांसाठी ऑक्सिजन ही आवश्यक बाब असल्याने या प्रस्तावावर एकमत झाले.