नाशिक (प्रतिनिधी): कळंबोलीहून विशाखापट्टणमला ऑक्सिजन आणण्यासाठी गेलेली विशेष रेल्वे आज शनिवारी (ता.२४) सकाळी नाशिकरोड स्थानकामध्ये दाखल होईल. त्यातील सातही टँकर नाशिकमध्ये उतरविण्यात येतील. त्यातील २ नाशिकसाठी असतील त्यामुळे ३१ मेट्रिक टन ऑक्सिजन नाशिकसाठी उपलब्ध होइल. बाकी २ अहमदनगरला पाठविण्यात येतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
या ऑक्सिजन एक्सप्रेसवर असलेल्या टँकरमुळे त्यांची उंची जास्त आहे. त्यामुळे नाशिकरोड रेल्वे मार्गावरील ओव्हररहेड वायरची उंची वाढविण्याचे आणि मुख्य विद्युत वाहिनी सरळ करण्याचे काम दोन दिवसांपासून सुरु होते. त्याची आणि विशेष मार्गाची पाहणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली. रेल्वे अधिकाऱ्यांकडून त्यांनी तयारीची माहितीदेखील घेतली.
राज्यात कोरोना बाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे जादा वायूसाठ्याची मागणी केली होती. केंद्राने विशाखापट्टणम येथील प्रकल्पातून ऑक्सिजन आणण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार राज्य शासनाने रेल्वेच्या माध्यमातून कळंबोली स्थानकातून सात टँकरसह ही गाडी सोमवारी पाठविली होती.
विशाखापट्टणम येथून गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही रेल्वे ऑक्सिजन घेऊन महाराष्ट्राच्या दिशेना रवाना झाली. ती आज शनिवारी सकाळी नाशिकरोड स्थानकात दाखल होईल. शुक्रवारी सांयकाळी पाच वाजता ही एक्सप्रेस गोंदिया येथे पोहचली होती.