नाशिक (प्रतिनिधी): शहरातील एका कारविक्रेत्या मालकाच्या इ-मेलचे फिशिंग करून हुबेहूब मेल पाठवत दोन ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठविण्याचे सांगत युनियन बँकेला तब्बल १९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि युनियन बँक व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीनुसार ४ ते ६ फेब्रुवारी या दिवशी बँकेत अनोळखी नंबरवरून फोन आला होता. स्टर्लिंग मोटारचे मालक फिरोज मिस्री बोलत असल्याचे सांगण्यात आले. लेटरहेड पाठवत त्यांनी चेक बुकची मागणी केली. स्टर्लिंग मोटार इ-मेलचे फिशिंग करून लेटरहेडही त्यांनी बनवले. त्यावर बोगस स्वाक्षरी करत चेक बुकची मागणी केली. तसेच आयसीआय बँकेच्या दोन खात्यात नऊ लाख ८० हजार ७०० आणि दुसऱ्या खात्यात आठ लाख ७९ हजार ७०० अशी रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितली. बँक व्यवस्थापनाने मोठे ग्राहक असल्याने कुठलीही शहानिशा न करता दोन पेमेंट ट्रान्सफर केले.
पुन्हा तिसऱ्या वेळी पैसे पाठविण्यास सांगितले असता बँक व्यवस्थापनाला संशय आला. त्यांनी कारच्या शोरूममध्ये पेमेंटबाबत विचारणा केली असता त्यांनी अशाप्रकारे कुठलेही पेमेंट जमा करण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट केले.
फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच सायबर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीनुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक देवराज बोरसे तपास करीत आहेत.