नाशिक (प्रतिनिधी): द्वारकाजवळील महालक्ष्मी चाळीच्या परिसरात झालेल्या दंगलीत आकाश रंजवे या युवकाचा खून झाला होता. या खूनप्रकरणी नऊपैकी सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बुधवारी (दि. १०) न्यायालयात हजर केले असता त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून एक अद्याप फरार आहे.
याप्रकरणी बुधवारीही पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. गुरुवारी (दि. ११) त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सशस्त्र दंगलप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. दंगलीत एक ठार व दोन युवक गंभीरपणे जखमी झाले आहेत. या दोन्ही गटांमधील सहभागी काही संशयितांविरुद्ध भद्रकालीसह अन्य पोलिस ठाण्यांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुख्य सूत्रधार तसेच संशयित तडीपार गुंड विशाल बेनवाल याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असून त्यास पोलिस उपायुक्तांकडून नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. मात्र, तरीही तो जुने नाशिक भागात वावरत होता. खुनाची घटना घडल्यानंतर विशाल हा त्याचा साथीदार अभयसोबत शहरातून फरार झाला.
त्याच्या मागावर असलेल्या भद्रकाली गुन्हे शोधपथकाने मुंबईतील माटुंगामधून मुसक्या बांधल्या. तसेच अभय बनेवाल यालाही पोलिसांनी अटक केली आहे. एक संशयित फरार आहे. त्यालाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांनी सांगितले. दत्त पवार अधिक तपास करीत आहे.