
नाशिक। दि. २७ नोव्हेंबर २०२६: शहरात अंमली पदार्थांची अवैध निर्मिती आणि साठवणूक रोखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल १०९ बंद गोदामे आणि कारखान्यांची तपासणी करण्यात आली. मात्र, या तपासणीदरम्यान कोणत्याही ठिकाणी संशयास्पद वस्तू अथवा अंमली पदार्थांशी संबंधित बाब आढळून आली नाही.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीने होणारी निर्मिती व साठवणूक रोखण्यासाठी बंद गोदामे आणि कारखान्यांची विशेष तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २५ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस उपायुक्त (गुन्हे) तसेच परिमंडळ १ आणि २ च्या उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
या विशेष मोहिमेत आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा, गंगापूर, मुंबई नाका, सातपूर, अंबड, इंदिरानगर, एमआयडीसी, उपनगर, नाशिकरोड आणि देवळाली कॅम्प या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील बंद गोदामे व कारखान्यांची झाडाझडती घेण्यात आली.
तपासणीदरम्यान कोणत्याही ठिकाणी अंमली पदार्थ किंवा संशयास्पद साहित्य आढळले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अंमली पदार्थांची अवैध निर्मिती, साठवणूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून अशा प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत. या अवैध व्यवसायात सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
![]()


