नाशिक | दि. २५ नोव्हेंबर २०२६: आरटीओ चलान प्रलंबित असल्याचा बनावट संदेश पाठवून सायबर गुन्हेगारांनी इंदिरानगरमधील एका व्यावसायिकाला तब्बल ४ लाख ५८ हजार ८०१ रुपयांचा आर्थिक गंडा घातला. मोबाईलवर आलेल्या संदेशातील एपीके फाईल डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्डसह दोन बँक खात्यांमधून परस्पर पैसे काढण्यात आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिक १ नोव्हेंबर रोजी दुपारपासून २ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आपल्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर आरटीओ चलानसंदर्भात एक टेक्स्ट मेसेज आला. या संदेशासोबत चलान डाउनलोड करण्याच्या नावाखाली एपीके फाईलची लिंक पाठवण्यात आली होती. अधिकृत संदेश असल्याचे समजून त्यांनी संबंधित लिंकवर क्लिक करून फाईल मोबाईलमध्ये डाउनलोड केली.
मात्र, त्यानंतर काही वेळातच त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारला. बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डमधून १ लाख २२ हजार १३३ रुपये, आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने १ लाख ८५ हजार ११४ रुपये, तर बँक ऑफ बडोदाच्या चालू खात्यातून १ लाख ५१ हजार ५५४ रुपये १६ पैसे काढण्यात आले.
अशा प्रकारे एकूण ४ लाख ५८ हजार ८०१ रुपये १६ पैशांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने इंदिरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
नागरिकांनी अनोळखी क्रमांकावरून येणाऱ्या आरटीओ चलान, बँक किंवा अन्य सरकारी सेवांच्या नावाखाली पाठवलेल्या एपीके फाईल्स डाउनलोड करू नयेत. अधिकृत वेबसाइट किंवा संबंधित सरकारी ॲपवरूनच माहितीची खातरजमा करावी.
![]()


