नाशिकमध्ये थंडीचा जोर ओसरला; आज (दि. २४) किमान तापमानाचा पारा १६.७ अंशांवर

नाशिक। दि. २४ नोव्हेंबर २०२६: शहरात गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा जोर आता ओसरला आहे. दोन दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे किमान तापमानात वाढ झाली असून, नाशिककरांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी (दि. २३) शहराचे किमान तापमान १६.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर मंगळवारी (दि. २४) त्यात वाढ होऊन ते १६.७ अंश सेल्सिअसवर पोहोचले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून ७.५० लाखांची फसवणूक; फरार भोंदूबाबाला अटक

तीन दिवसांपूर्वी, शुक्रवारी शहरातील किमान तापमानाचा पारा थेट १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरला होता. या हंगामातील ही आतापर्यंतची नीचांकी नोंद ठरली होती. सलग दोन दिवस तापमान १० अंशांच्या आसपास राहिल्याने नाशिककरांना कडाक्याच्या थंडीचा अनुभव आला. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांनी शेकोट्यांचाही आधार घेतला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विवाहितेचा सासरी छळ; पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

दरम्यान, ‘अक्वान’ चक्रीवादळ राज्याच्या सीमेलगतच्या भागातून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीमार्गे ओडिशाच्या दिशेने सरकल्यानंतर राज्यात थंडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे तापमानात मोठी घसरण झाली होती. मात्र, त्यानंतर वातावरणात पुन्हा बदल झाल्याने किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे.

सध्या शहरात पहाटेच्या वेळी काहीसा गारवा जाणवत असला, तरी तापमानाचा पारा १६ अंशांच्या पुढे गेल्याने थंडीची तीव्रता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. परिणामी, गेल्या काही दिवसांतील कडाक्याच्या थंडीपासून नाशिककरांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790