नाशिक: पत्नीच्या खुनाची कबुली; फरार पतीला अटक, न्यायालयाकडून पोलीस कोठडी

नाशिक। दि. २१ नोव्हेंबर २०२६: पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली फरार असलेल्या पतीला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे. मोबाईलचा लॉक पासवर्ड सांगत नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीवर संशय घेतल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस चौकशीत संशयिताने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली असून, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दुचाकी वाहनांसाठी ‘एमएच १५-एलजी’नवीन मालिका २३ नोव्हेंबरपासून सुरू

आकाश सुरेश जाधव (वय ३०, रा. कोमल सोसायटी, पेठरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याची पत्नी पूजा जाधव हिने मोबाईलला लॉक कोड लावला होता. मात्र, ती पासवर्ड सांगत नसल्याने आकाश तिच्या चारित्र्याबाबत संशय व्यक्त करीत होता.

याच संशयातून गुरुवारी पहाटे राहत्या घरी आकाशने ओढणीच्या साहाय्याने पूजाचा गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. या प्रकरणी मृत पूजाची बहीण सुधा यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी मतदारांनी ३० नोव्हेंबरपर्यंत गणना प्रपत्र भरून देण्याचे आवाहन

दरम्यान, संशयित आकाश हा बोरगड परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने शोधमोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने पत्नीच्या हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अटकेनंतर संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून, प्रकरणाचा पुढील तपास म्हसरूळ पोलीस करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790