नाशिक: चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून

नाशिक। दि. २० नोव्हेंबर २०२६: पेठरोडवरील कोमल सोसायटी परिसरात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी (दि. १९) उघडकीस आली. चारित्र्याच्या संशयासह मोबाइल देण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान या हत्येत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

पूजा आकाश जाधव (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असून, आकाश सुरेश जाधव (वय ३२) असे संशयित पतीचे नाव आहे. तो रिक्षाचालक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आणि पूजा यांचा विवाह २०१५ मध्ये बिहार येथे झाला होता. आकाशला दारूचे व्यसन असून, मद्यप्राशन करून घरी आल्यानंतर तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार तिच्याशी वाद घालत असे. या वादातून तो पूजाला मारहाणही करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी मतदारांनी ३० नोव्हेंबरपर्यंत गणना प्रपत्र भरून देण्याचे आवाहन

या प्रकरणी पूजाची बहीण सुधा यादव यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, जून २०२६ मध्ये सुधा काही दिवस बहिणीकडे राहण्यासाठी आल्या असताना आकाशने त्यांच्यासमोरही पूजाला मारहाण केली होती. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. दारूसाठी सुधा यांच्याकडे पैशांची मागणीही तो करत असे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याने सुधा यांनाही घरातून निघून जाण्यास सांगितले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: RTO कडून खाजगी प्रवासी बसेस व वाहनांची 20 नोव्हेंबरपर्यंत विशेष तपासणी मोहिम

दरम्यान, गुरुवारी सकाळी पूजाचा चुलत भाऊ शशीकुमार यादव याने सुधा यांना फोन करून आकाशने पूजाचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच सुधा यांनी तातडीने बहिणीच्या घरी धाव घेतली. त्यावेळी बेडरूममधील गादीवर पूजा निश्चल अवस्थेत पडलेली आढळली. तिची श्वासोच्छ्वासाची हालचाल बंद होती. तसेच तिच्या गळ्यावर नखांच्या खुणा दिसून आल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आजपासून (दि. १९) YCMOU चा 'इंद्रधनुष्य'- २२वा आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव २०२६ !

म्हसरूळ पोलिसांकडून तपास सुरू:
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात संशयित पती आकाश जाधव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790