नाशिक: RTO कडून खाजगी प्रवासी बसेस व वाहनांची 20 नोव्हेंबरपर्यंत विशेष तपासणी मोहिम

नाशिक। दि. १९ नोव्हेंबर २०२६: प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचे पालन करणे तसेच खाजगी प्रवासी बस वाहतुकीतील नियमभंगाला आळा घालण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 20 नोव्हेंबर, 2026 पर्यंत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

त्यानुषंगाने सर्व खाजगी बस वाहतूकदारांनी आपल्या वाहनांची वैध कागदपत्रे जवळ ठेवावीत. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार वाहन सुयोग्य स्थितीत असल्याची खात्री करूनच प्रवासी वाहतूक करावी. तसेच प्रवाशांकडून नियमानुसारच भाडे आकारावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: आजपासून (दि. १९) YCMOU चा 'इंद्रधनुष्य'- २२वा आंतरविद्यापीठीय युवक महोत्सव २०२६ !

या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ३१७ खाजगी प्रवासी बसेसची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १२७ बसेस दोषी आढळल्या आहेत. संबंधित वाहनांवर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईतून आतापर्यंत ३ लाख ९९ हजार रुपये तडजोड शुल्क (दंड) व करापोटी वसूल करण्यात आले आहेत.

या मोहिमेदरम्यान बसेसची तपासणी करताना विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करून वाहन चालविणे, टप्पा वाहतूक करणे, प्रवासी बसमधून अवैधरीत्या मालवाहतूक करणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहून नेणे, तसेच प्रवाशांकडून निर्धारित दरापेक्षा जादा भाडे आकारणे आदी बाबी तपासण्यात येत आहेत. याशिवाय वाहनांचे वैध योग्यता प्रमाणपत्र, रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाईट, वायपर, वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या केलेले फेरबदल आणि मोटार वाहन कर भरल्याची खातरजमा करण्यात येत आहे. प्रवाशांच्या आपत्कालीन सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा कार्यरत आहे किंवा नाही, आपत्कालीन निर्गमन द्वार व इतर दरवाजे सुस्थितीत आहेत किंवा नाहीत, तसेच पॅनिक बटन कार्यरत आहे किंवा नाही, याचीही तपासणी केली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे 21 नोव्हेंबर रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके

खाजगी प्रवासी बस वाहतुकीतील नियमांचे पालन, वाहनांची तांत्रिक सुस्थिती आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांची काटेकोर तपासणी करण्यात येत आहे. त्यानुषंगाने वाहतूकदारांनी नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक केल्यास विशेष तपासणीदरम्यान संबंधित वाहन दोषी आढळून आल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक व अन्य आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजश्री गुंड यांनी कळविले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790