
नाशिक। दि. १५ नोव्हेंबर २०२६: हिमालयातील बर्फाच्छादित पर्वतरांगा ओलांडून हजारो किलोमीटरचा प्रवास करणारा आणि आपल्या विलक्षण उड्डाणक्षमतेसाठी जगभर प्रसिद्ध असलेला ‘बार-हेडेड गूज’ अर्थात पट्टेरी हंस नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात दाखल झाला आहे. या देखण्या स्थलांतरित पक्ष्याच्या आगमनामुळे पक्षीप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निसर्गाने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगतीत घडविलेला हा पक्षी आपल्या सौंदर्यामुळे सहज लक्ष वेधून घेतो. पांढऱ्याशुभ्र मस्तक आणि मानेवर असलेले काळ्या रंगाचे दोन ठळक, वक्राकार पट्टे ही त्याची प्रमुख ओळख आहे. चेहऱ्यावरील पिवळसर छटा आणि पिवळी चोच यामुळे त्याचे रूप अधिकच आकर्षक दिसते.
मात्र, या पक्ष्याचे वैशिष्ट्य केवळ त्याच्या सौंदर्यापुरते मर्यादित नाही. जगातील सर्वाधिक उंचीवरून स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांमध्ये पट्टेरी हंसाचा समावेश होतो. हिमालयासारख्या उंच पर्वतरांगा ओलांडताना अत्यंत कमी ऑक्सिजन, कडाक्याची थंडी आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करण्याची त्याची क्षमता थक्क करणारी आहे. दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून हा पक्षी आपल्या हिवाळी अधिवासात पोहोचतो.
नांदूर मध्यमेश्वर हे स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे अधिवासस्थान मानले जाते. अशा ठिकाणी पट्टेरी हंसाचे आगमन होणे ही पक्षी निरीक्षकांसाठी विशेष पर्वणी ठरली आहे. शांत पाणथळ प्रदेशात मुक्तपणे विहार करणारे आणि आकाशात थव्याने उंच भरारी घेणारे हे पक्षी परिसराच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी भर घालत आहेत.
विशेष म्हणजे, यंदा नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची चर्चा सुरू असताना हिमालयातून आलेल्या या पाहुण्याच्या आगमनालाही एक वेगळे प्रतीकात्मक महत्त्व प्राप्त झाले आहे. हिमालयातील हा जणू ‘ऋषी’ गोदातिरी दाखल झाला असून, नांदूर मध्यमेश्वरमधील पक्ष्यांच्या कुंभमेळ्यात त्यानेही हजेरी लावली आहे!
![]()


