Amazon

केंद्रीय आर्थिक सल्लागारांच्या पथकाकडून नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा

नाशिक। दि. ३ नोव्हेंबर २०२६: भारत सरकारच्या आर्थिक सल्लागार पथकाने रविवारी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयाला भेट देऊन आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी करण्यात येत असलेले नियोजन, प्रशासकीय तयारी आणि विविध यंत्रणांमधील समन्वय याबाबत चर्चा करण्यात आली.

या पथकामध्ये आर्थिक सल्लागार डॉ. अनुराधा गुरु, डॉ. रोझ मेरी के. अब्राहम आणि संचालक कोकिला जयराम यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी या पथकाचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी प्राधिकरणाच्या कार्यालयात संवादात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अज्ञात ट्रकच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू; अपघातानंतर चालक पसार

या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी सुरू असलेल्या तयारीची माहिती पथकाला देण्यात आली. मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या धार्मिक सोहळ्याचे नियोजन करताना आवश्यक असलेली प्रशासकीय व्यवस्था, विविध विभागांमधील समन्वय आणि शहराची सज्जता या विषयांवर यावेळी विचारविनिमय झाला.

नाशिकच्या आर्थिक क्षमतेची आणि विविध क्षेत्रांतील विकासाच्या संधींची माहिती घेण्यासाठी आयोजित व्यापक आर्थिक अभ्यास दौऱ्याचा हा एक भाग होता. या दौऱ्यामध्ये कृषी क्षेत्र, प्रगत उत्पादन उद्योग, जीवन विज्ञान आणि उदयोन्मुख उद्योगांच्या क्षेत्रांतील संधींचा अभ्यास करण्यासाठी विविध कृषी व औद्योगिक आस्थापनांना भेटी देण्यात आल्या.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप; मृताच्या आई-वडिलांना एक लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश

कुंभमेळा आयुक्तांसोबत झालेल्या संवादातून पथकाला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनातील नागरी प्रशासनाची भूमिका आणि एवढ्या मोठ्या धार्मिक सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या नियोजनाची माहिती मिळाली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790