Amazon

नाशिक: खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेप; मृताच्या आई-वडिलांना एक लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश

नाशिक | दि. २ नोव्हेंबर २०२६: अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच मृत तरुणाच्या आई-वडिलांना एक महिन्याच्या आत एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. आनंद देवराम आंबेकर (वय २९, रा. पंडितनगर, सिडको, नाशिक) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ही घटना ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ५.३० ते ६ वाजेच्या सुमारास कामठवाडे रोडवरील मरीमाता मंदिरासमोर घडली होती. या घटनेत आरोपी आनंद आंबेकर याने आनंदा वसंत इंगळे (वय ३०) यांच्याशी शिवीगाळ करून फरशीने त्यांच्या डोक्यावर वार केले होते. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने आनंदा इंगळे यांचा मृत्यू झाला होता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ स्तरावर हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित

याप्रकरणी वसंत सखाराम इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७८/२०२४ अन्वये भारतीय दंड विधान कलम ३०२, ५०४ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(२)(व्ही) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख (अंबड विभाग) यांनी मदतनीस पोलीस अंमलदार रवि शिरोळे यांच्या सहकार्याने केला. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध सबळ पुरावे संकलित करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: दिवाळीनिमित्त शहरातील 'या' महत्वाच्या वाहतूक मार्गांत ९ दिवस महत्वाचे बदल; खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घ्या...

या खटल्याची सुनावणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ येथे झाली. फिर्यादी, साक्षीदार आणि पंच यांनी दिलेल्या साक्षींसह तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी आरोपीला भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. याशिवाय, मृताच्या आई-वडिलांना एक महिन्याच्या आत एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही नुकसानभरपाई न दिल्यास आरोपीला एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी पिकांचे अवशेष व नैसर्गिक गवताचे संवर्धन करण्याचे आवाहन

सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती भानुप्रिया पेटकर आणि आर. पी. गावित यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली. तसेच पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, अभियोग कक्ष, कोर्ट अंमलदार, महिला पोलीस हवालदार रंजना गायकवाड आणि पैरवी अंमलदार पोलीस हवालदार रामनाथ आजगे यांनी खटल्याच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत वेळोवेळी पाठपुरावा केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790