
नाशिक, दि. ३० ऑक्टोबर २०२६: नाशिक–त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर धार्मिक आणि आध्यात्मिक उपक्रमांना सुरुवात झाली असून, आज तपोवन मैदान येथून सिंहस्थ कुंभमेळा महाध्वज ग्राम परिक्रमेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या हस्ते महाध्वजाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर संत-महंत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाध्वज रामतीर्थ, पंचवटीच्या दिशेने मार्गस्थ झाला.
या सोहळ्यामुळे तपोवन परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर धार्मिक विधी आणि मंत्रोच्चारांच्या वातावरणात महाध्वजाचे पूजन करण्यात आले. उपस्थित भाविकांनी महाध्वजाचे दर्शन घेत ग्राम परिक्रमेत उत्साहाने सहभाग नोंदविला.
कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सामूहिक योगदान आवश्यक:
यावेळी जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शासन, प्रशासन, संत-महंत आणि भाविकांनी एकत्रितपणे योगदान देण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून देशाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडविणारा जागतिक स्तरावरील महोत्सव आहे. या पर्वासाठी देशभरातून तसेच जगभरातून कोट्यवधी भाविक नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि आवश्यक सुविधांनी युक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासन विविध स्तरांवर नियोजन करीत आहे.
या भव्य आयोजनात संत-महंतांचे मार्गदर्शन आणि स्वयंसेवकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. महाध्वज ग्राम परिक्रमेच्या माध्यमातून सिंहस्थ कुंभमेळ्याचा धार्मिक आणि आध्यात्मिक संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार असून, भाविकांमध्ये कुंभमेळ्याविषयी श्रद्धा आणि उत्साह अधिक वृद्धिंगत होईल, असेही त्यांनी नमूद केले.
सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सामाजिक समरसता, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सेवाभाव या मूल्यांच्या आधारे सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे महाजन यांनी सांगितले. यावेळी महंत संजयदास महाराज यांनीही आपले मनोगत व्यक्त करून या धार्मिक उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्यास महापौर हिमगौरी आडके, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, श्रीमहंत ज्ञानदास महाराज, मंगलपीठाधीश्वर श्री १००८ माधवाचार्य महाराज, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरी महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे महंत, संत-महंत आणि हजारो भाविक उपस्थित होते.
यामध्ये श्री पंच निर्मोही अग्नी आखाड्याचे श्रीमहंत राजेंद्रदास महाराज, महंत संजयदास महाराज, श्रीमहंत मुरलीदास महाराज, श्रीमहंत वैष्णवदास महाराज, पंच दिगंबर अग्नी आखाड्याचे श्रीमहंत माधवदास महाराज, श्रीमहंत मोहनदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज आणि महंत रामस्नेही महाराज यांचा समावेश होता.
महाध्वज ग्राम परिक्रमेमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्वाची उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली असून, आगामी कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी नाशिकमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
![]()


