Amazon

नाशिक: ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करा; पाण्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात- पालकमंत्री गिरीश महाजन

नाशिक। दि. ३० ऑक्टोबर २०२६: अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उन्हाची तीव्रता वाढून बाष्पीभवनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरेल, याची दक्षता घ्यावी. पाण्याचा अवैध उपसा रोखावा, पाणी उपसणारे विद्युत पंप बंद ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच पाणी बचतीसाठी सामूहिक प्रयत्न करताना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सन २०२६-२०२७ करिता पाटबंधारे प्रकल्पांतील पिण्याच्या पाण्याच्या आकस्मिक व प्रासंगिक आरक्षणाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आज (दि. ३०) नाशिकमध्ये भव्य नगरपरिक्रमा !

पालकमंत्री श्री. महाजन म्हणाले की, उन्हाळ्यात वाढणारी उष्णता आणि बाष्पीभवनामुळे पाण्याची मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध जलसाठ्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच पाण्याचा अपव्यय आणि अवैध उपसा रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्ष राहावे. पाणी बचत ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करून उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी उपलब्ध राहील, असे नियोजन आतापासूनच करतानाच पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच पाणी चोरी, पाणी गळती रोखण्यासाठी आतापासूनच उपाययोजना कराव्यात, असे सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: क्रोमियम उत्सर्जन करणाऱ्या कंपन्यांची महिनाभरात १०० टक्के तपासणी करण्याचे आदेश

महापौर श्रीमती आडके आहेर यांनी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात सुरू असलेला पाणीपुरवठा, आवश्यक पाण्याची उपलब्धता याविषयी माहिती दिली, तर जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती दिली. गंगापूर धरण समुहात सरासरी ९५ टक्के, गिरणा धरण समूहात सुमारे ९८ टक्के, पश्चिमवाहिनी नदीखोऱ्यातील धरणांमध्ये सुमारे ९१ टक्के, तर मध्यम व लघु धरणांमध्ये सुमारे ९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याचा काटकसरीने वापराबाबत विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

🔎 हे वाचलं का?:  त्र्यंबकेश्वरमध्ये ३० व ३१ ऑक्टोबर रोजी वाहतुकीत बदल

जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने आणि कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी जिल्ह्यातील उपलब्ध जलसाठा, पाणी आरक्षण आणि संबंधित प्रकल्पांची माहिती सादर केली. त्यांनी पाणी चोरी, अवैध उपसा रोखण्यासाठी जलसंपदा, महसूल, पोलिस विभागाची पथके गठित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर हिमगौरी आडके आहेर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, मालेगावचे रोहित जगताप आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत आदी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790