Amazon

नाशिक: मसाला कारखान्यावर FDA ची धडक कारवाई; २,२३० किलो मसाला जप्त

नाशिक। दि. २४ ऑक्टोबर २०२६: आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा वेग वाढवला आहे. याच मोहिमेअंतर्गत द्वारका परिसरातील तिगरानिया औद्योगिक क्षेत्रातील एका मसाला उत्पादक आस्थापनेवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत लेबलिंग नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्याने तसेच मसाल्यांच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाल्याने एकूण ११ लाख ८६ हजार रुपये किमतीचा २ हजार २३० किलो मसाल्यांचा साठा जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नवमतदार नोंदणीसाठी अवघे चार दिवस शिल्लक; नाशिक जिल्ह्यात ७७ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त

द्वारका परिसरातील आस्थापनेवर तपासणी:
द्वारका येथील तिगरानिया इंडस्ट्रियल एरिया, प्लॉट क्रमांक ५/६, सर्व्हे क्रमांक ४०२/१ येथे असलेल्या ‘मे. सोमेश्वर घरगुती मसाले’ या आस्थापनेची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी मसाल्यांच्या पाकिटांवरील लेबलिंगमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. तसेच संबंधित मसाले अन्नसुरक्षा निकषांनुसार आहेत की नाहीत, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने संबंधित मसाल्यांचा साठा जप्त करण्याची कारवाई केली.

कोणते मसाले जप्त केले?
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या मसाल्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

  • हळद पावडर: ३३८ किलो — २,०२,८०० रुपये
  • कांदा-लसूण मसाला: ४८ किलो — १,१९,२०० रुपये
  • धणे पावडर: २८८ किलो — १,१५,२०० रुपये
  • सुपर मिक्स गरम मसाला: २१६ किलो — ७५,६०० रुपये
  • स्पेशल मिक्स काळा मसाला: ६६४ किलो — २,६६,४०० रुपये
  • काळा मसाला: ३३८ किलो — २,३६,६०० रुपये
  • मिरची पावडर: ३३८ किलो — २,७०,४०० रुपये
🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सप्तशृंगी गडावरील गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक निर्बंधांत बदल

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई:
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे, सहआयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त व्ही. पी. धवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील आणि ऋतुजा नवले यांच्या पथकाने संबंधित आस्थापनेची तपासणी करून मसाल्यांचा साठा जप्त केला.

🔎 हे वाचलं का?:  सिंहस्थ कुंभमेळा २०२७: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्ता दुरुस्तीला NMA ची मंजुरी

सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा राबवण्यात येत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790