Amazon

कुशावर्त परिसरातील ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला अधिक गती द्यावी- आयुक्त शेखर सिंह

नाशिक। दि. २१ ऑक्टोबर २०२६: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ परिसरात सुरू असलेली विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ वाढवून कामांना अधिक गती द्यावी. तसेच सुशोभीकरण, मंडप व्यवस्था, आसन व्यवस्था आणि सोहळ्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व सुविधा चोख ठेवाव्यात, असे निर्देश कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी कुशावर्त तीर्थ व परिसर तसेच नियोजित हेलिपॅडची परिसराची पाहणी केली. यावेळी विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

कुशावर्त तीर्थ परिसरातील विकासकामे आणि सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थांची पाहणी करताना कामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले. ज्या कामांना अधिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे, तेथे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. परिसराचे सुशोभीकरण, परिसर स्वच्छता, मंडप उभारणी, आसन व्यवस्था तसेच कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या सर्व बाबींचे सूक्ष्म नियोजन करून त्या वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिककर उकाड्याने हैराण; उद्या (दि. २१) जिल्ह्यात गडगडाटासह पावसाची शक्यता

ध्वजारोहण सोहळ्यासाठी येणा-या महत्वाच्या व्यक्ती, मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि उपस्थित नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधांची योग्य व्यवस्था करावी. कामांच्या अंमलबजावणीत कोणतीही दिरंगाई होणार नाही, यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय राखून कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी उपलब्ध कालावधी लक्षात घेता कामांना अधिक गती देणे आवश्यक आहे. अद्याप प्रलंबित असलेल्या कामांसाठी संबंधित विभागांनी दिवसनिहाय आराखडा निश्चित करावा. या आराखड्यानुसार दररोज झालेल्या कामांचा प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'अमृत' तर्फे दुर्गोत्सव 2026 चे आयोजन

प्रलंबित कामांना प्राधान्य देऊन त्यांची पूर्तता निश्चित कालमर्यादेत करावी. प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदारीतील कामांचे नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवावे. कामांमध्ये कोणतीही अडचण उद्भवल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करून सोहळ्यापूर्वी सर्व व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील, याची दक्षता घ्यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

सर्व संबंधित विभागांमार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती, सद्यस्थिती, काम पूर्ण होण्याच्या कालावधीची माहिती संबंधितांनी यावेळी दिली. यावेळी आमदार हिरामण खोसकर, त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, उपनगराध्यक्षा पल्लवी शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक विमला एस., सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र पवार, महावितरणचे अधीक्षक अभियंता अनिल थोरात, तहसीलदार गणेश जाधव, त्र्यंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे मुख्याधिकारी अमोल चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमेश पवार, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता निलेश बिऱ्हाडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता जगदीश जाधव, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790