Amazon

नाशिक जिल्ह्यात ‘जी राम जी’ योजनेंतर्गत ६४ हजार ५२७ कामांचा आराखडा तयार

जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि शेतजमिनीची उत्पादकता वाढविण्यावर भर; ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

नाशिक। दि. २१ ऑक्टोबर २०२६: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची तीव्रता कमी करण्यासह ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने ‘जी राम जी’ योजनेंतर्गत ६४ हजार ५२७ कामांचा जिल्हास्तरीय आराखडा तयार केला आहे.

या आराखड्यात जलसंधारण, भूजल पुनर्भरण, पाणीसाठा वाढविणे, शेतजमिनीची उत्पादकता वाढविणे आणि ग्रामीण भागातील नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणाऱ्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. या आराखड्यात जलसंधारणाची ६१ हजार २२५ कामे असून, उर्वरित ३ हजार ३०२ कामे इतर दुष्काळ प्रतिबंधक स्वरूपाची आहेत. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देतानाच दुष्काळाचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना उभारण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गांत आज (दि. २०) महत्वाचे बदल...

जलसंधारणाच्या कामांवर विशेष भर:
जलसंधारणाच्या कामांमध्ये माती बांध, नालाबांध, सिमेंट बांध, दगडी व भूमिगत बांध, गॅबियन बंधारे, नदी व तलावांचे पुनरुज्जीवन, शेततळी, वनतळी, सलग समतल चर (सीसीटी), शोषखड्डे, विहिरींचे पुनर्भरण आणि पावसाचे पाणी साठविण्यासाठीच्या विविध कामांचा समावेश आहे. या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन भूजलपातळी वाढण्यास आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारण्यास हातभार लागणार आहे.

तालुकानिहाय कामांचे नियोजन:
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये स्थानिक गरजा आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन कामांचे नियोजन करण्यात आले आहे. मालेगाव तालुक्यात २२ हजार ५ कामे प्रस्तावित असून, त्यापैकी २० हजार कामे जलसंधारणाची आहेत. दिंडोरी तालुक्यात ५ हजार २७६, त्र्यंबकेश्वरमध्ये ५ हजार १६५, बागलाणमध्ये ४ हजार ७००, सिन्नरमध्ये ४ हजार १५० आणि येवला तालुक्यात ४ हजार ८५ कामे प्रस्तावित आहेत. नांदगाव तालुक्यात ३ हजार ७०७, कळवणमध्ये ३ हजार ४१५, पेठमध्ये ३ हजार २७६, देवळा तालुक्यात २ हजार ३४१, निफाडमध्ये १ हजार ९७६, सुरगाणा येथे २ हजार ४६९, इगतपुरीत २ हजार ४४८ आणि चांदवडमध्ये २ हजार ५६५ कामांचा समावेश आहे. नाशिक तालुक्यात ६७० कामे प्रस्तावित आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'दहशतवाद्यांकडे तुमचे आधारकार्ड सापडले' असे सांगत ७१ लाखांचा गंडा

पशुधन, शेती आणि ग्रामीण पायाभूत सुविधांना बळ:
दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पाणी व चारा उपलब्धता, शेतीसाठी सिंचनाच्या सुविधा आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या कामांसोबतच शेतजमिनीची पाणीधारण क्षमता वाढविणे, जमिनीची धूप रोखणे, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यावर भर देण्यात येणार आहे.

🔎 हे वाचलं का?:  राज्यातील 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा

स्थानिक मजुरांना रोजगाराची संधी:
ग्रामीण भागात मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे हा या नियोजनाचा महत्त्वाचा उद्देश आहे. गावांच्या गरजांनुसार कामे हाती घेतल्यास दुष्काळी परिस्थितीत ग्रामीण कुटुंबांना रोजगाराचा आधार मिळेल. त्याचबरोबर निर्माण होणाऱ्या जलसंधारणाच्या सुविधांमुळे भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होईल.

‘जी राम जी’ योजनेंतर्गत प्रस्तावित कामांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती आणि जलसंधारण यांची सांगड घालून दुष्काळाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील जलसुरक्षा मजबूत होण्यासह शेती आणि पशुधनासाठी आवश्यक संसाधने उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे उपजिल्हाधिकारी सीमा अहिरे यांनी म्हटले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790