Amazon

सप्तशृंगी गडाजवळ झालेल्या अपघातात नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाचे निधन

नाशिक। दि. १८ ऑक्टोबर २०२६ (जिल्हा माहिती कार्यालय):
आज दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.४० वाजता, शक्तीपीठ सप्तशृंगी गड येथे भाविकांची मोठी गर्दी असल्याने वाहतूक व गर्दी नियंत्रणासाठी तैनात असलेले नाशिक ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक गायकवाड व पोलीस हवालदार सचिन राऊत यांना नांदुरी-अभोणा टी-पॉइंट जवळ झालेल्या अपघाताचा सामना करावा लागला.

नाशिकच्या दिशेने येणाऱ्या मारुती सियाझ (MH 12 ML 7747) या कारने टी-पॉइंटच्या पाच मीटर अलीकडे एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर ही कार वळून दुसऱ्या वाहनाला (MH 15 KU 8895) चालकाच्या बाजूने धडकली. वाहतूक वळविण्यासाठी लावलेल्या बॅरिकेडमुळे कार भाविकांच्या गर्दीत शिरली नाही; अन्यथा अनेक भाविकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असता.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रबडी दुकानात धक्कादायक प्रकार; सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या, FDA ची कारवाई

या अपघातात पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्या हनुवटीला व पाठीच्या कण्याला गंभीर फ्रॅक्चर झाले आणि रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. पोलीस हवालदार सचिन राऊत यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. मोरेश्वर बाळू पाटील (वय ५२, रा. महापे, मुंबई) यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले असून त्यांच्या पत्नी तेजस्वी व राम गोपाळ एकनाथ सोनवणे यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: इंदिरानगरमधील सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

सर्व जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांचे शवविच्छेदन जिल्हा शासकीय रुग्णालयात सुरू असून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांवर मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट, नाशिक येथे उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांनी दोन्ही रुग्णालयांना भेट दिली. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके नेमण्यात आली आहेत. पोलीस कल्याण निधीतून तातडीने आर्थिक मदत देण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक गायकवाड यांच्यावर नाशिक शहरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शेअर ट्रेडिंगमधून कोट्यवधींच्या नफ्याचे आमिष दाखवून ९८.६० लाखांची फसवणूक

कर्तव्य बजावत असताना झालेल्या या दुर्दैवी घटनेत आपल्या सहकाऱ्याला गमावल्याबद्दल जिल्हा पोलीस दल व जिल्हा प्रशासन तीव्र शोक व्यक्त करीत आहे. गायकवाड कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेबद्दल तीव्र खेद व्यक्त करण्यात येत आहे.

गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांनी व भाविकांनी विशेष दक्षता बाळगावी, वाहतूक नियमांचे पालन करावे व पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790