Amazon

नाशिक: ‘मी या एरियाचा भाई आहे’ म्हणत दोघांना दांडक्याने मारहाण; नागचौकात दहशत

नाशिक। दि. १९ ऑक्टोबर २०२६ : घराजवळ उभे असण्याबाबत विचारणा केल्याचा राग मनात धरून चौघांनी दोघांना लाकडी दांडका आणि फळीने मारहाण केल्याची घटना नागचौक परिसरात घडली. मारहाणीनंतर संशयितांनी धारदार वस्तू हातात घेऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

तसेच पोलिसांत तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शनिवारी (दि. १७ ऑक्टोबर) मध्यरात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कारची काच फोडून २० लाखांची रोकड लंपास; अवघ्या काही मिनिटांत चोरट्यांनी बॅग पळवली

नागचौक परिसरात राहणारे दुग्ध व्यावसायिक सागर अशोक गरड आणि त्यांचे मित्र विकी बर्गे हे रात्री सुमारे बाराच्या सुमारास घराबाहेर असताना त्यांना जवळच एक अनोळखी व्यक्ती उभी असल्याचे दिसले.

गरड यांनी संबंधित व्यक्तीला घराजवळ उभे राहण्याबाबत विचारणा केली. यावरून वादाला सुरुवात झाली. संशयित किशोर वाकोडे, गणेश आणि त्यांच्या अन्य दोन साथीदारांनी दोघांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर लाकडी दांडका आणि फळीने मारहाण केल्याने गरड आणि बर्गे हे दोघे जखमी झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा; ३८ सायबर गुन्ह्यांशी संबंधित संशयित बदलापुरातून अटकेत

मारहाणीनंतर संशयितांनी कमरेला लावलेली धारदार वस्तू बाहेर काढून हातात मिरवली. ‘मी या एरियाचा भाई आहे’, ‘एक-एकाचा मुडदा पाडतो’, तसेच पोलिसांत तक्रार केल्यास गंभीर परिणाम होतील, अशा धमक्या दिल्याचा आरोप आहे. यानंतर संशयितांनी शिवीगाळ करत नागरिकांच्या मागे धावण्यास सुरुवात केल्याने परिसरात घबराट पसरली. भीतीमुळे अनेक नागरिकांनी घरांचे दरवाजे बंद करून घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर! पार्किंग, साधुग्राम अन् घाट विकासाचा आढावा

घटनेनंतर चौघेही पसार झाले. याप्रकरणी सागर गरड यांच्या फिर्यादीवरून किशोर वाकोडे, गणेश आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. (पंचवटी पोलीस ठाणे, गुन्हा रजिस्टर क्रमांक: ५७९/२०२६)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790