नाशिक। दि. १७ ऑक्टोबर २०२६: राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, ज्येष्ठ क्रीडा महर्षी तसेच साहसी उपक्रम आणि दिव्यांग खेळाडूंसाठी विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षांच्या पुरस्कारांसाठी पात्र खेळाडू व संबंधित व्यक्तींनी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
शासन निर्णयानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची सुधारित नियमावली, २०२३ विहित करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार राज्यातील उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू आणि साहसी उपक्रमांमध्ये सहभागी झालेल्या पात्र व्यक्तींना पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहेत.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षींसाठी जीवनगौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम) तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
इच्छुक पात्र अर्जदारांनी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२६ असून, त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे पात्र खेळाडू व संबंधित व्यक्तींनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी श्रीमती पाटील यांनी केले आहे.
![]()


