नाशिक। दि. १७ ऑक्टोबर २०२६: प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिकमार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात १५ वर्षे पूर्ण झालेली शासकीय वाहने तसेच थकीत शासकीय कर, पर्यावरण कर व विविध कारणांमुळे जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा ई-लिलाव करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने वाहनधारकांनी आपल्या वाहनांचा थकीत कर, पर्यावरण कर व तडजोड शुल्क तात्काळ अदा करून आपली वाहने नियमानुसार सोडवून घ्यावीत. वाहनांच्या लिलावामुळे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी थकबाकी वेळेत भरावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिकमार्फत मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन (MSTC) च्या ई-लिलाव पोर्टलद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शासकीय मालकीची १५ वर्षे पूर्ण झालेली वाहने तसेच थकीत कर, अपूर्ण कागदपत्रे किंवा इतर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळल्यामुळे जप्त केलेली वाहने लिलावासाठी उपलब्ध करून दिली जातात. या प्रक्रियेंतर्गत आतापर्यंत एकूण ११३ वाहनांचा लिलाव करून ४9 लाख ३० हजार ००1 रुपयांचा महसूल शासनास जमा करण्यात आला आहे.
परिवहन विभागामार्फत वाहनधारकांनी शासकीय कर थकीत ठेवल्यास तसेच वाहनांची आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्यास किंवा अन्य नियमभंगाच्या कारणांमुळे संबंधित वाहने जप्त करण्यात येतात. अशा वाहनांचा नियमानुसार लिलाव करून महसूल वसूल करण्याची कार्यवाही कार्यालयामार्फत केली जाते, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. शिंदे यांनी कळविले आहे.
![]()


