नाशिक। दि. १६ ऑक्टोबर २०२६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी १७ व १८ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांच्या माध्यमातून पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविणे, नावातील दुरुस्ती करणे तसेच आवश्यकतेनुसार इतर बदलांसाठी अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
पुनरीक्षण कार्यक्रमानुसार ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीच्या अनुषंगाने दावे व हकरती सादर करण्याचा कालावधी २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर विशेष मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहून नागरिकांचे मतदार नोंदणी, दुरुस्ती व नाव वगळण्याबाबतचे अर्ज स्वीकारणार आहेत. या मोहिमेदरम्यान अर्ज क्रमांक सहा, सात व आठ भरण्यासाठी २६ ऑक्टोबर २०२६ ही शेवटची तारीख आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन सुविधाही उपलब्ध:
१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी अर्ज करता येणार आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना-६, मतदार यादीतील नाव व तपशिलात दुरुस्तीसाठी नमुना-८ तसेच संबंधित कारणानुसार आवश्यक नमुन्यांमध्ये अर्ज सादर करता येतील. हे अर्ज संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे किंवा भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट आहे किंवा नाही, याची नागरिकांनी खात्री करून घ्यावी. पात्र नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार नोंदणी, अर्जांचे नमुने आणि इतर माहितीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, नाशिक येथे दूरध्वनी क्रमांक ०२५३-२३१०५२३ यावर संपर्क साधावा.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व पात्र नवमतदारांना तसेच कोणत्याही कारणामुळे प्रारुप यादीत नाव समाविष्ट होऊ न शकलेल्या सर्व पात्र नागरिकांना नमुना ६ व घोषणापत्र भरुन नाव समाविष्ट करण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच प्रारुप मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्तीसाठी नमुना आठ त्यासोबत घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रांसह सादर करता येईल.
संबंधित मतदारसंघातील कोणताही मतदार या यादीतील नोंद वगळण्यासाठी नमुना क्रमांक सात भरुन हरकत घेऊ शकेल. ज्या मतदारांना बीएलओ यांच्याकडून नोटीस प्राप्त झाली आहे त्यांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे तत्काळ बीएलओ यांना उपलब्ध करून द्यावेत. तसेच www.voters.eci.gov.in या संकेतस्थळावरून देखील ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करता येतील. सर्व मतदार नोंदणी कार्यालयात नमुना क्रमांक सहा, सात व आठ ऑफलाइन सुद्धा सर्व पात्र नागरिकांना उपलब्ध आहेत. या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
![]()


