Amazon

नाशिक जिल्ह्याबाहेर चारा वाहतूक व विक्रीवर बंदी; दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नाशिक। दि. १६ ऑक्टोबर २०२६: नाशिक जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम राखण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर वाहतूक करून विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार हिरवा चारा, कडबा, कुट्टी, पेंढा, टीएमआर (एकूण मिश्रित पशुखाद्य) तसेच इतर प्रकारच्या पशुखाद्याची जिल्ह्याबाहेर वाहतूक व विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला या आदेशातून वगळण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  महाराष्ट्रात सुट्या मसाल्यांच्या विक्रीवर निर्बंध; भेसळखोरांवर कठोर कारवाईचा इशारा

राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने नाशिक जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’ (प्रथम कळ) दुष्काळ जाहीर केला आहे. नाशिक जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांत तसेच सीमावर्ती भागांत मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठविला जाण्याची शक्यता लक्षात घेता, भविष्यात चाऱ्याची टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी बाब प्रशासनाने नमूद केली आहे. जिल्ह्यातील पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध व्हावा आणि संभाव्य चारा टंचाई टाळता यावी, या उद्देशाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  मध्य रेल्वेच्या ब्लॉकचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका; दोन एक्स्प्रेस १० तासांहून अधिक विलंबाने

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला हा आदेश १३ ऑक्टोबर २०२६ पासून १० डिसेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: स्कूल ऑफ आर्टिलरीतर्फे 27 ऑक्टोबर रोजी तोफखाना व गोळीबाराची प्रात्यक्षिके

जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. संबंधितांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790