Amazon

नाशिक जिल्ह्यात ५५ गाव-वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

नाशिक। दि. १० ऑक्टोबर २०२६: दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त गावांना व वाड्यांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. दि. ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील मालेगाव व येवला या दोन तालुक्यांमधील एकूण ५५ गाव-वाड्यांना १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, यामुळे ३७ हजार ७१४ नागरिकांना दिलासा मिळत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कालिका यात्रोत्सवानिमित्त शहरातील 'या' वाहतूक मार्गांत महत्वाचे बदल

जिल्हा परिषद, नाशिकच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, मालेगाव तालुक्यातील ६ गावे व १४ वाड्यांना, अशा एकूण २० ठिकाणी ६ टँकरच्या १२ फेऱ्या व्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. या माध्यमातून १३ हजार १४० नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. येवला तालुक्यातील १२ गावे व २३ वाड्यांना, अशा एकूण ३५ ठिकाणी ९ टँकरच्या १८ फेऱ्या द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, याचा लाभ २४ हजार ५७४ नागरिकांना होत आहे.

🔎 हे वाचलं का?:  भगूरला रेणुका देवी यात्रेनिमित्त वाहतूक मार्गामध्ये महत्वाचे बदल

जिल्ह्यातील टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची स्थिती लक्षात घेता, मालेगाव व येवला या तालुक्यांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे.

राज्य शासनाने राज्यातील टंचाईची परिस्थिती लक्षात घेता २६५ तालुके दुष्काळी जाहीर केले असून यात नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांचा समावेश आहेत. या पार्श्वभूमीवर संबंधित तालुक्यात शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून पाणीटंचाईच्या परिस्थितीत नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासन व जिल्हा प्रशासनाकडून प्राधान्याने कार्यवाही करण्यात येत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790