Amazon

सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या खासगी वाहनांना नवरात्रोत्सव व कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रवेशबंदी

२० ऑक्टोबरपर्यत आणि २५ ते २६ ऑक्टोबरदरम्यान निर्बंध लागू; एसटी बसेसना परवानगी

नाशिक। दि. ११ ऑक्टोबर २०२६: सप्तशृंगी गड, ता. कळवण येथे नवरात्रोत्सव तसेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गडावर जाणाऱ्या खासगी वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार आजपासून ते २० ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तसेच दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २६ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: अभियानात दुष्काळ निवारणासाठी गावागावांत जलसंधारणाची कामे हाती घ्या - मुख्यमंत्री

अपर जिल्हादंडाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ११५ अन्वये हे आदेश जारी केले आहेत. अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव दि. ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान साजरा होणार आहे. तसेच दि. २५ व २६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भाविक मोठ्या संख्येने गडावर दर्शनासाठी येतात. या कालावधीत खासगी वाहनांची संख्या वाढल्याने गडावरील घाटरस्त्यावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. घाटरस्ता अरुंद व वळणावळणाचा असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाने हे निर्बंध लागू केले आहेत.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: कालिका यात्रोत्सवानिमित्त शहरातील 'या' वाहतूक मार्गांत महत्वाचे बदल

एसटी बसेसना प्रवेश; खासगी वाहनांना बंदी:
या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वगळता इतर सर्व मालवाहू वाहने, ऑटोरिक्षा, खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांना सप्तशृंगी गडावर जाण्यास प्रवेशबंदी लागू राहणार आहे. भाविकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

🔎 हे वाचलं का?:  भगूरला रेणुका देवी यात्रेनिमित्त वाहतूक मार्गामध्ये महत्वाचे बदल

परिस्थितीनुसार या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा किंवा आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक बदल करण्याचा अधिकार प्रशासनाने राखून ठेवला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि मोटार वाहन अधिनियम, १९८८ मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही अपर जिल्हादंडाधिकारी श्री. राजपूत यांनी आदेशात म्हटले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790