
नाशिक। दि. ११ ऑक्टोबर २०२६: राज्यातील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावांचा सर्वांगीण विकास साधतानाच संभाव्य दुष्काळी परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, पाणी बचत आणि रोजगारनिर्मिती यावर विशेष भर देण्यात येणार आहे. या उद्देशाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२६-२७’ राबविण्यात येणार असून, या अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवार, 11 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. यानिमित्त ‘सरपंच परिसंवाद’ आयोजित करण्यात आला आहे. ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जिल्हा परिषद, नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेस ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, यशदा चे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. गोरे म्हणाले की, मागील अभियानाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे साडेपाच हजार गावांमध्ये विविध विकासकामे करण्यात आली. विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून गावांच्या विकासासाठी उपलब्ध निधी व संसाधनांचा प्रभावी वापर करण्यात आला. गावांतर्गत रस्ते, पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता, जलसंधारण आदी विविध क्षेत्रांत कामे करण्यात आली. लोकसहभागातून विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आगामी अभियानात गावातील पाण्याचे स्रोत बळकट करणे, पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा विचार करून गावनिहाय पाणी नियोजन करणे आवश्यक आहे. जलसंधारणाची कामे गावाच्या दीर्घकालीन पाणी सुरक्षेसाठी उपयुक्त ठरतील, यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक गावाने पुढील ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात येणार आहेत. ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर आणि पाणी वापराचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचेही मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
गावातील विकासकामांसोबतच शेतमजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यावरही अभियानात भर देण्यात येणार आहे. जलसंधारण, पाणी साठवण आणि इतर ग्रामविकासाच्या कामांमधून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
गावाचा विकास साधतानाच स्थानिक मनुष्यबळाला काम उपलब्ध व्हावे, या उद्देशाने विकासकामे आणि रोजगारनिर्मिती यांचा समन्वय साधण्यात येणार असून अभियानाच्या शुभारंभानिमित्त आयोजित ‘सरपंच परिसंवादा’त राज्यातील सरपंचांना गावांच्या विकासासाठी आवश्यक नियोजन, जलव्यवस्थापन, दुष्काळपूर्व उपाययोजना आणि अभियानाच्या उद्दिष्टांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून गावांचा शाश्वत विकास साधण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
![]()


