नाशिकमध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक पकडली; १२.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक। दि. १४ सप्टेंबर २०२६: महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी घेऊन जाणारा आयशर ट्रक एमआयडीसी पोलिसांनी अंबड येथील गरवारे पॉइंट परिसरात पकडला. या कारवाईत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह आयशर ट्रक असा एकूण १२ लाख ८५ हजार ६६२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात पावसाची पुन्हा हजेरी; घाटमाथ्यावर आज ‘यलो अलर्ट’

या प्रकरणी पोलिसांनी चेतन दत्तात्रय पोमण (३४, रा. सारूळा, ता. भोर, जि. पुणे) याला ताब्यात घेतले आहे. तसेच वसीम पठाण (रा. मुंबई) याचाही आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पोमण हा एमएच १७ एजी ९३५९ क्रमांकाच्या आयशर ट्रकमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला आणि तंबाखूजन्य माल घेऊन जात होता. हा माल विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केला जात असल्याचा संशय आल्याने पोलिस पथकाने गरवारे पॉइंट परिसरात कारवाई करत ट्रक ताब्यात घेतला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लोखंडी पाइपला दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू

२.८५ लाखांचा प्रतिबंधित माल:
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विमल पानमसाल्याचे ३१५ पुडे, व्ही-१ बिग तंबाखूचे ३१५ पुडे आणि राजश्री पानमसाल्याचे २०८ पुडे, तसेच अन्य तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. या प्रतिबंधित मालाची एकूण किंमत २ लाख ८५ हजार ६६२ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: म्हसरुळला एसटी बस- दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

याशिवाय सुमारे १० लाख रुपये किमतीचा आयशर ट्रकही पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत १२ लाख ८५ हजार ६६२ रुपयांवर पोहोचली आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या पुरवठा साखळीचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790