नाशिक। दि. १४ सप्टेंबर २०२६: सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विविध विकासकामे वेगाने सुरू असताना, या कामांच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्थेकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आला आहे. कृषिनगरकडून तिबेटीयन मार्केटमार्गे सिद्धार्थनगरकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यात आडवा ठेवलेल्या लोखंडी पाइपला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात सिद्धार्थ दत्तात्रय गोरे (३३) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे मित्र मनोज सूर्यवंशी गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर संतप्त नातेवाइक आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत गोरे यांचा मृतदेह थेट महापालिकेच्या राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर आणून आंदोलन केले. ‘न्याय मिळेपर्यंत मृतदेह हलवणार नाही’, अशी भूमिका घेत आंदोलकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. अखेर महापालिका प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
पावसात पाइपला धडक:
शनिवारी (दि. १२) रात्री साडेअकराच्या सुमारास सिद्धार्थनगर येथील कृषिनगर जॉगिंग ट्रॅकजवळ हा अपघात झाला. अंबड येथील साई सिद्धी रो-हाउस येथे राहणारे सिद्धार्थ गोरे हे गंगापूर रोडवरील एका रुग्णालयात कार्यरत होते. काम आटोपल्यानंतर ते मित्र मनोज सूर्यवंशी यांच्यासोबत दुचाकीने (एमएच १५ एचबी ३०३५) घरी परतत होते.
सिद्धार्थनगर परिसरात भूमिगत पाइपलाइनचे काम सुरू असल्याने वाहतूक रोखण्यासाठी रस्त्यावर लोखंडी पाइप आडवा ठेवण्यात आला होता. त्यावेळी जोरदार पाऊस आणि अपुरा प्रकाश असल्याने हा अडथळा गोरे यांच्या लक्षात आला नसल्याचे सांगण्यात येते. दुचाकी थेट पाइपला धडकल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले. धडकेमध्ये दुचाकीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, रविवारी (दि. १३) पहाटे अडीचच्या सुमारास उपचारादरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ गोरे यांना मृत घोषित केले. मनोज सूर्यवंशी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सिद्धार्थ यांच्या पश्चात पत्नी आणि सहा महिन्यांची व दोन वर्षांची अशा दोन लहान मुली असा परिवार आहे. रस्त्यांवरील खड्डे तसेच विविध विकासकामांदरम्यान सुरक्षेचा अभाव यामुळे शहरात झालेल्या मृत्यूंच्या घटनांमध्ये हा चौदावा बळी असल्याचा दावा नातेवाइकांकडून करण्यात आला असून, नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
महापालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या:
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी सिद्धार्थ यांचा मृतदेह थेट महापालिकेच्या राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर आणला. प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निषेध करत त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पतकी यांच्यासह गजेंद्र पाटील, राकेश चौधरी आणि श्रीनिवास देशमुख यांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
दरम्यान, महिला नातेवाइकांनी राजीव गांधी भवनसमोर रास्ता रोको केला. यामध्ये सिद्धार्थ यांची आई, पत्नी, लहान मुलगी तसेच अन्य नातेवाइक सहभागी झाले होते. ‘लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही’, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक लोकप्रतिनिधी प्रियंका दोंदे, किरण राजवाडे, प्रशांत खरात, प्रतिभा पवार आणि राकेश दोंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन नातेवाइकांच्या मागण्या महापालिका प्रशासनासमोर मांडल्या. महापालिकेचे शहर अभियंता अजय अग्रवाल यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
निष्काळजीपणास कारणीभूत ठरलेल्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही तसेच बाधित कुटुंबातील एका सदस्याला मानधनावर सेवेत घेण्याबाबत विचार आणि आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर नातेवाइकांनी आंदोलन मागे घेतले.
दरम्यान, रविवारी सायंकाळपर्यंत गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
![]()


