नाशिक। दि. १४ सप्टेंबर २०२६: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर नाशिक जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ११.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, सोमवारी जिल्ह्याच्या घाटमाथ्यासाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, काही भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
रविवारी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’, तर घाटमाथ्यावरील भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला होता. त्याआधी शनिवारी दिवसभर जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यानंतर रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्याची सरासरी पावसाची नोंद ११.२ मिलीमीटर इतकी झाली.
सुरगाण्यात सर्वाधिक पाऊस:
सुरगाणा तालुक्यात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहिला. तालुक्यातील विविध भागांत जोरदार सरी कोसळल्या असून, ३९.१ मिलीमीटर पावसाची सर्वाधिक नोंद झाली. त्याखालोखाल दिंडोरीत २९.१, त्र्यंबकेश्वरमध्ये २४.९, पेठमध्ये १५.६, कळवणमध्ये १५.४ आणि बागलाणमध्ये ११.३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. नाशिक तालुक्यातही १३.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रविवारी ग्रामीण भागातील काही ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याचे चित्र होते.
नाशिक शहरात १६.८ मिलीमीटर पाऊस:
नाशिक शहरातही पावसाने चांगली हजेरी लावली. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत शहरात १६.८ मिलीमीटर पाऊस झाला. शनिवारी सायंकाळच्या सुमारास उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला होता. त्यानंतर पहाटेही पावसाच्या सरी बरसल्याने अनेक दिवसांच्या खंडानंतर शहरात समाधानकारक पाऊस नोंदविला गेला.
रविवारी ‘यलो अलर्ट’ कायम असला तरी शनिवारीच्या तुलनेत पावसाची तीव्रता कमी होती. दिवसभर अधूनमधून भुरभुर सुरू राहिल्याने शहरात सूर्यदर्शन झाले नाही. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात आणखी १.१ मिलीमीटर पावसाची भर पडली.
![]()


