नाशिक: विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव पिकअपने दुचाकीला उडवले; २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

नाशिक। दि. २७ ऑगस्ट २०२६ : मुंबई-आग्रा महामार्गावरील बळी मंदिर परिसरातील उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेप्रकरणी आडगाव पोलिसांनी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता १ सप्टेंबरला; तारखेत बदल

मृत तरुणाचे नाव दीपक गवजीराम चोरमले (वय २७, रा. जेऊर, ता. मालेगाव) असे आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २३ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे दोन वाजता दीपक दुचाकी (एमएच ४१ बीबी ७५०४) घेऊन नाशिकच्या दिशेने बळी मंदिर उड्डाणपुलावरून जात होता. याचवेळी समोरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगात आलेल्या पिकअपने (एमएच १२ डब्ल्यूएक्स ९३५४) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: वाहन मालकांनी आधार प्रमाणिकरण प्रक्रियेनंतरच हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

धडकेमुळे दीपक रस्त्यावर कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४८/२०२६ अन्वये पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, द्वारका चौक, रासबिहारी चौक आणि बळी मंदिर परिसरात विरुद्ध दिशेने भाजीपाला तसेच अन्य मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जाते. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या या प्रकारामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित यंत्रणांनी अशा वाहनांवर नियमितपणे कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण

वाहतूक पोलिस आणि परिवहन विभागाच्या भरारी पथकाने या मार्गावर विशेष मोहीम राबवून विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केल्यास अशा जीवघेण्या घटनांना आळा घालण्यास मदत होऊ शकते.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790