नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे तीन दिवसीय ‘कुंभ भक्ती संगम’ची तयारी पूर्ण

नाशिक। दि. २७ ऑगस्ट २०२६: नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे नाशिक शहरात आयोजित कुंभ भक्ती संगमात शुक्रवार २८ ऑगस्टपासून भक्ती, संगीत आणि विविध भारतीय सांस्कृतिक परंपरांचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. ‘कुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून २८ ते ३० ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे हा महोत्सव होईल. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून, तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नसल्याने नाशिककर, भाविक, विद्यार्थी आणि सांस्कृतिक रसिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले.

या महोत्सवाचे २८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन होणार असून, रात्री ८ ते १० या वेळेत राहुल देशपांडे ‘अभंगवारी’ सादर करतील.

29 ऑगस्टला भक्ती संमेलनासह कीर्तन-भजन:
२९ ऑगस्ट हा दिवस ‘भक्ती संमेलन’ आणि विविध भक्ति कार्यक्रमांच्या सादरीकरणांनी समृद्ध असेल. सकाळी १० ते १२ आणि दुपारी २ ते ४ या वेळेत दोन सत्रांमध्ये भक्ती संमेलन होईल. पहिल्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : भारतीय संत आणि समरसता’ असून पराग महाराज चातुर्मासे हे सत्र समन्वयक असतील. या सत्रात शिवाजी महाराज मोरे, डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, महंत श्रीमानस शास्त्री, सुदर्शन महाराज कपाटे, सुप्रिया साठे आणि प्रमोद महाराज जगताप सहभागी होतील.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: २८ ते ३० ऑगस्ट सिंहस्थ 'महाकुंभ भक्ती संगम'चे आयोजन

दुसऱ्या सत्राचा विषय ‘सिंहस्थ महाकुंभमेळा : राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग आणि समन्वय’ असून, डॉ. सदानंद मोरे हे सत्र समन्वयक असतील. श्री राणा महाराज वासकर, डॉ. द्वाराचार्य, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर, जनार्दन हरिजी महाराज, रामकृष्ण महाराज वीर, मंदार बुवा रामदासी आणि महंत श्री. चिरडे बाबा यांचा या सत्रात सहभाग असेल.

भक्ती संमेलनानंतर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे यांचे कीर्तन, तर रात्री ८ ते १० या वेळेत कु. मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होईल.

गुरबाणीपासून मणिपूरच्या नट संकिर्तनापर्यंत:
महोत्सवाच्या ३० ऑगस्टच्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा विशेष अनुभव घेता येणार आहे. दुपारी ३ ते ८ या वेळेत श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. सायंकाळी ४ ते ५ या वेळेत मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगदा आज (दि. २७) दुपारी १ तासासाठी बंद

वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थेचे नियोजन:
महोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक, पार्किंग आणि गर्दी व्यवस्थापनाचे नियोजन संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने करण्यात आले आहे. नागरिकांनी वाहनांसाठी निश्चित केलेल्या पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत आणि वाहतूक पोलिस तसेच कार्यक्रमस्थळी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. सायंकाळच्या कार्यक्रमांना रसिकांची मोठी उपस्थिती अपेक्षित असल्याने नागरिकांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी पुरेसा वेळ ठेवून ठक्कर डोम येथे पोहोचावे, असे आवाहन आयुक्त श्री. सिंह यांनी केले.

आयुक्त श्री. सिंह म्हणाले, की ‘कुंभ भक्ती संगम’ हा नाशिककरांसाठी आणि देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी भक्ती, संगीत आणि विविध भारतीय परंपरांचा अनुभव घेण्याची एक चांगली संधी आहे. या कार्यक्रमासाठी कोणतेही प्रवेशशुल्क नाही. त्यामुळे नाशिककरांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या तीन दिवसांचा आनंद घ्यावा.”

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: जप्त गौण खनिजांचा जाहीर लिलाव आता १ सप्टेंबरला; तारखेत बदल

कार्यक्रमाच्या पावित्र्याला सहकार्य करण्याचे आवाहन:
शबद कीर्तनाच्या वेळी उपस्थित भाविकांनी अध्यात्मिक भाव जपण्यासाठी शिर झाकून ठेवावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाचे पावित्र्य, परिसरातील स्वच्छता आणि शिस्त कायम राहावी, यासाठी गुटखा, पान, बिडी, सिगारेट तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन कार्यक्रमस्थळी करू नये, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्थळ : ठक्कर डोम, नाशिक
कालावधी : २८ ते ३० ऑगस्ट २०२६
प्रवेश : विनामूल्य; तिकीट अथवा प्रवेशिका आवश्यक नाही

“सिंहस्थ महाकुंभ मेळा”च्या तयारीमध्ये पायाभूत सुविधांसोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभवाला देखील महत्त्व आहे. महाराष्ट्राच्या नारदीय कीर्तन आणि अभंगवारीपासून गुरबाणी शबद कीर्तन आणि मणिपूरच्या नट संकीर्तनापर्यंत विविध परंपरा नाशिकमध्ये एकत्र येत आहेत. हा खऱ्या अर्थाने भक्तीचा संगम आहे.” – शेखर सिंह, आयुक्त, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790