
नाशिक। दि. २४ ऑगस्ट २०२६: शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी, पिकांच्या समस्या व कृषी निविष्ठांच्या गरजा प्रत्यक्ष जाणून घेत त्यावर तातडीने व व्यवहार्य उपाययोजना कराव्यात. तसेच दर्जेदार कृषी निविष्ठा, योग्य दरात व गरजेच्या वेळी उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महामंडळाच्या उपक्रमांचा प्रभावी वापर करावा, असे निर्देश महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी दिले.
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री काकडे यांनी १३ व १४ ऑगस्ट २०२६ रोजी नाशिक जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी थेट संवाद साधला. कृषी निविष्ठांची गुणवत्ता व उपलब्धता, उत्पादन खर्च, पिकांच्या समस्या, बाजारपेठेच्या संधी तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी महामंडळाची भूमिका अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टीने त्यांनी क्षेत्रीय परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक योगेश बिडवे व संबंधित अधिकारी होते.
शेतकऱ्यांकडून थेट अभिप्राय घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना:
इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरातील शेतांना श्री. काकडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची सद्यस्थिती, खते व कीटकनाशकांची गरज, कृषी निविष्ठांचा दर्जा, उत्पादन खर्च आणि बाजारपेठेशी संबंधित अडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांकडून थेट मिळणारा अभिप्राय हा नियोजन व निर्णय प्रक्रियेसाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच क्षेत्रीय स्तरावर निदर्शनास आलेल्या प्रश्नांवर व्यवहार्य व कालबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार कृषी निविष्ठांची उपलब्धता आणि त्यांचा योग्य वापर याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यावरही त्यांनी भर दिला.
कृषी निविष्ठा योग्य दर्जाच्या व वाजवी दरात उपलब्ध करून देण्यावर भर:
मालेगाव परिसरातील शेतकरी बांधवांशी संवाद साधताना महामंडळाची खते, कीटकनाशके, पशुखाद्य, कृषी अभियांत्रिकी साहित्य आणि NOGA उत्पादने योग्य दर्जाची, वाजवी दरात तसेच गरजेच्या वेळी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे श्री. काकडे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांची मागणी, उत्पादन आणि वितरण यामध्ये अधिक सक्षम समन्वय निर्माण करून कृषी निविष्ठांचा वेळेत पुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. महामंडळाच्या उत्पादन व वितरण व्यवस्थेचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी क्षेत्रीय यंत्रणेने अधिक सक्रियपणे काम करावे, असेही त्यांनी सांगितले.
अजंग प्रकल्पातील उत्पादन व गुणवत्ता व्यवस्थेचा आढावा:
मालेगाव तालुक्यातील अजंग येथील महामंडळाच्या जैविक खते व कीटकनाशके निर्मिती प्रकल्पास श्री. काकडे यांनी भेट देऊन उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन क्षमता, साठवणूक आणि पुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वेळेत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन व वितरणाचे नियोजन काटेकोरपणे करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. कारखाना लवकर कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने पूर्ण करून प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
गावपातळीवर ‘शेतकरी संवाद’ बैठका घेण्याचे निर्देश:
दौऱ्यादरम्यान श्री. काकडे यांनी विभागीय व्यवस्थापक, विक्री प्रतिनिधी आणि कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या समन्वयाने गावपातळीवर नियमित ‘शेतकरी संवाद बैठका’ आयोजित करण्याचे निर्देश दिले. या बैठकांमधून स्थानिक पिकांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेऊन कृषी विभागाच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार योग्य खते, कीटकनाशके व अन्य कृषी निविष्ठांच्या वापराबाबत शेतकऱ्यांना माहिती द्यावी. तसेच ‘महा अॅग्रो मार्ट’च्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या बाजारपेठीय संधीची माहितीही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना त्यांनी केल्या. शेतकरी संवादाचा उद्देश केवळ कृषी निविष्ठांची विक्री वाढविणे नसून, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांतील समस्या समजून घेऊन योग्य, वस्तुनिष्ठ व माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करणे हा आहे. योग्य तांत्रिक मार्गदर्शनामुळे अनावश्यक कृषी निविष्ठांचा वापर टाळता येईल, पिकांचे नुकसान कमी करता येईल तसेच उत्पादन आणि उत्पन्नाचे संरक्षण करण्यास मदत होईल, असेही श्री. काकडे यांनी यावेळी सांगितले.
![]()


