महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.. कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट, जाणून घ्या…

मुंबई/नाशिक। दि. २४ ऑगस्ट २०२६: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याची शक्यता असून, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात 25 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पावसाने काही दिवस उसंत घेतल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाळ्याला अडीच महिन्यांहून अधिक काळ उलटत असतानाही अनेक भागांत अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. विशेषतः मराठवाड्यातील काही भागांमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे शेतीसह पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न पुढील काळात गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासह अत्याधुनिक सुविधा देण्यास कटिबद्ध- मंत्री प्रकाश आबिटकर

सात जिल्ह्यांना यलो अलर्ट:
हवामान विभागाने राज्यातील सात जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाची शक्यता असून, राज्यातील उर्वरित भागांत हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे.

कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस:
24 ऑगस्ट रोजी कोकण-गोवा परिसरातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागांतही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘शिक्षण उत्सव २०२६’मधून शिक्षकांच्या कार्याचा गौरव; संवाद, नवोपक्रम आणि सहकार्याला नवी दिशा

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस, तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. एकूणच, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत इतर प्रदेशांच्या तुलनेत पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.

हवामानातील बदल लक्षात घेता शेतकरी आणि नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गोसेखुर्द धरणातून विसर्गात वाढ:
दरम्यान, पूर्व विदर्भात मुसळधार पावसामुळे जलसाठ्यांवरही परिणाम झाला आहे. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने जोरदार पाऊस सुरू असल्याने पुजारीटोला आणि धापेवाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत करण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

हे पाणी गोसेखुर्द धरणात दाखल होत असल्याने धरणातील जलसाठाही वेगाने वाढत आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका टाळण्यासाठी आणि धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ केली आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: ‘आईला २५ हजार देतो’ म्हणत तरुणीला जाळ्यात ओढले; बनावट लग्नातून २ लाख उकळले

दुपारपर्यंत गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले होते. त्यातून सुमारे 81 हजार 506 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, दुपारनंतर परिसरात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर धरण प्रशासनाने आणखी चार दरवाजे उघडले.

सध्या गोसेखुर्द धरणाचे 23 दरवाजे अर्धा मीटरने उघडे असून, त्यातून 96 हजार 417 क्युसेक प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. म्हणजेच दुपारच्या तुलनेत विसर्गात 15 हजार 911 क्युसेक प्रतिसेकंदांनी वाढ करण्यात आली आहे. पावसाचा जोर आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आणि सतर्क राहणे गरजेचे आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790