नाशिक। दि. २३ ऑगस्ट २०२६: शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भद्रकाली देवी मंदिरातून सिंहाची पितळी मूर्ती चोरीला गेल्याची घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या तासाभरात दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीला गेलेली मूर्तीही जप्त करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने मच्छिंद्र राजू पवार (३८, रा. घरकुल वसाहत, चुंचाळे) आणि राजू अब्बास बागवान (२६, रा. दूध बाजार नाका, भद्रकाली) यांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी त्यांना भद्रकाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
मंदिरातील पौरोहित्य आणि व्यवस्थापनाची जबाबदारी पाहणारे मंदार रत्नाकर कावळे (४०) यांनी याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या खिडकीतून प्रवेश करून देवीसमोरील सुमारे २५ किलो वजनाची, दोन फूट उंच आणि अंदाजे ३० हजार रुपये किमतीची पितळी सिंहाची मूर्ती चोरून नेली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने गुन्हे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना तातडीने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, गुन्हे शाखा युनिट-२चे पथक गस्त घालत असताना अमलदार प्रवीण वानखेडे आणि जितेंद्र वजीरे यांना संशयितांबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. यानंतर पथकाचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी फाटा ते अंबडगाव रोड परिसरात सापळा रचण्यात आला.
![]()


