नाशिक: सिमकार्ड बंद पडले, नवीन सिम घेतले; तोपर्यंत खात्यातून ५१ लाख गायब

नाशिक। दि. २२ ऑगस्ट २०२६: मोबाईल नेटवर्क अचानक बंद झाल्यानंतर त्याचा गैरफायदा घेत सायबर हॅकरने नाशिकरोड येथील एका ठेकेदाराच्या कंपनीच्या बँक खात्यावर ताबा मिळवला. त्यानंतर खात्यातील तब्बल ५१ लाख रुपये आरटीजीएस आणि आयएमपीएसच्या माध्यमातून परस्पर वळते करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक शहरातील 'या' भागांत शनिवारी (दि. २२) वीजपुरवठा बंद राहणार

तक्रारदार हे बीएसएनएल कंपनीसाठी कंत्राटी काम करणारे असून, कामानिमित्त दिल्लीतील मोदीनगर येथे गेले होते. १६ ऑगस्टच्या सायंकाळी त्यांच्या मोबाईलचे नेटवर्क अचानक गायब झाले. त्यांनी ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला असता जुने सिमकार्ड बंद झाल्याचे सांगण्यात आले. त्यांना नवीन सिमकार्ड घेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांनी १७ ऑगस्ट रोजी नवीन सिमकार्ड घेतले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या २ हजार ४२१ पदांसाठी भरती

दरम्यान, कंपनीच्या बँक खात्याची माहिती घेतल्यानंतर खात्यात केवळ १८ हजार रुपये शिल्लक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी खात्याच्या व्यवहारांची तपासणी केली.

दोन दिवसांत सहा व्यवहारांतून रक्कम वळती:
अकाऊंटंट जाधव यांनी ठेकेदाराला १२ लाख रुपयांचा आरटीजीएस करण्यास सांगितले होते. मात्र, बँक खात्यात लॉगिन केल्यानंतर खात्यात केवळ १८ हजार २३६ रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. त्यानंतर खात्याचे व्यवहार तपासले असता १६ आणि १७ ऑगस्ट या दोन दिवसांत सायबर हॅकरने पाच आरटीजीएस आणि एका आयएमपीएस व्यवहाराद्वारे कंपनीच्या खात्यातील मोठी रक्कम विविध बँक खात्यांमध्ये वळती केल्याचे स्पष्ट झाले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे 22 ऑगस्ट रोजी आयोजन

मोबाईलचे नेटवर्क बंद झाल्यानंतर सिमकार्डचा अॅक्सेस मिळवून हा प्रकार करण्यात आल्याचा संशय असून, या प्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790