नाशिक। दि. १४ ऑगस्ट २०२६: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’, ‘एक पेड माँ के नाम’ वृक्षारोपण अभियान, नशामुक्त भारत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्व 17 नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी सांगितले की, ‘हर घर तिरंगा’ अभियान राबवताना शहरी भागात जास्तीत जास्त नागरिकांचा लोकसहभाग नोंदवावा. या अभियानात स्वयंसेवी संस्था, गणेश मंडळे, शाळा, महाविद्यालय, लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांचा सहभाग घ्यावा. त्यात रॅली, पदयात्रा, सायकल रॅली, मॅरेथॉन, एक श्याम शहिदो के नाम, देशभक्तीपर गीते, शहिदो को वंदन, शहीद जवानांच्या/शहीद पोलिसांच्या वीर पत्नी, वीर मातांचा सन्मान, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करावा. रात्री मशाल रॅली काढावी.
तसेच नशामुक्त भारत अभियानात जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नशामुक्त जीवन जगण्याची शपथ देण्याची तसेच मादक द्रव्यांपासून दूर राहण्याची शपथ द्यावी. यानिमित्त रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रम राबवावेत.
‘एक पेड माँ के नाम’ ही मोहीम प्रभावीपणे राबवीत लावण्यात आलेल्या रोपांची नोंद पोर्टलला घ्यावी. याबरोबरच जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करावी. प्रत्येक नगरपरिषदेने किमान पाच खुले भूखंड मियावाकी पद्धतीने विकसित करावेत. या अभियानांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग नोंदवून घ्यावा. सामाजिक वनीकरण, वन विभाग याच्या नर्सरी मधून मोठ्या स्वरूपाची झाडे प्राप्त करून घ्यावीत. सर्व शासकीय कार्यालये, व्यावसायिक आस्थापना, बँका, कंपन्या, मंगल कार्यालयांचा सहभाग घ्यावा. सामाजिक दायीत्व निधी तसेच लोकसहभागातून जास्तीत जास्त पर्यावरण पूरक उपक्रम राबवावेत, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी केले आहे.
![]()


