नाशिक: सोशल मीडियावरील ओळख पडली महागात; क्रिप्टो ट्रेडिंगच्या आमिषाने ८.५५ लाखांची फसवणूक

नाशिक। दि. १० ऑगस्ट २०२६: सोशल मीडिया अॅपवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत क्रिप्टोकरन्सी आणि शेअर ट्रेडिंगमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची तब्बल ८ लाख ५५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी नाशिक सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाची १४ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत सोशल मीडियावर ‘पलक’ नावाच्या प्रोफाइलशी ओळख झाली. सुरुवातीला सोशल मीडिया अॅपवर संवाद झाल्यानंतर दोघांनी मोबाइल क्रमांकांची देवाणघेवाण केली. त्यानंतर त्यांच्यात नियमित संपर्क सुरू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: किडनॅपिंग तसेच खंडणीच्या गुन्ह्यातील 9 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद

या ओळखीचा फायदा घेत संशयित महिलेने क्रिप्टोकरन्सी आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे सांगितले. तिच्या सांगण्यावरून तक्रारदाराने एका कथित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरील संकेतस्थळावर खाते उघडले. त्यानंतर विविध UPI आयडी तसेच बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास त्याला प्रवृत्त करण्यात आले.

मात्र, गुंतवणुकीनंतर अपेक्षित नफा मिळाला नाही. तक्रारदाराने गुंतवलेली रक्कम परत मागितल्यानंतर संशयितांकडून वेगवेगळी कारणे सांगत पैसे परत करण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर आणखी पैसे भरल्यास ट्रेडिंग कमिशन, प्रोसेसिंग फी आदींची पूर्तता होऊन संपूर्ण रक्कम परत मिळेल, असे सांगण्यात आले. या भूलथापांना बळी पडून तक्रारदाराकडून आणखी रक्कम उकळण्यात आली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यातील भूकंपाबाबत जिल्हा प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा

फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे धाव घेतली. तपासादरम्यान फसवणुकीची रक्कम विविध बँक खाती आणि आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून पुढे वळवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. त्यांच्या सांगण्यावरून अनधिकृत वेबसाइट, संशयास्पद ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किंवा शेअर बाजारातील योजनांमध्ये पैसे गुंतवू नयेत. कमी कालावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहावे. तसेच आकर्षक प्रोफाइल, फोटो किंवा विश्वासार्ह वाटणाऱ्या ऑनलाइन ओळखीच्या आधारे आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790